Solapur Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने (Congress) माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना (Praniti Shinde) उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपने (BJP) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सोलापूरात यावेळी आमदार विरुद्ध आमदार अशी ही निवडणूक होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे. (Lok Sabha 2024: Ram Satpute vs Praniti Shinde in Solapur; How is the constituency? Who will win? )
या मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी 1,58,608 मतांच्या फरकाने काॅंग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. या मतदारसंघात 11 वेळा काॅंग्रेस तर 5 वेळा भाजपचा उमेदवार निवडून आला आहे.
काॅंग्रेसला गड परत मिळवायचाय –
1952 मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. तेव्हापासून अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे. 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा राखीव मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हा सुशीलकुमार शिंदे निवडून आले. पण 2014च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि त्याठिकाणी भाजपच्या शरद बनसोडे या नवख्या उमेदवाराचा विजय झाला होता. 2014 पासून हा मतदारसंघ भाजपकडेच आहे. 2019मध्ये भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडून आले. तेव्हा त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचाच पराभव केला होता. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवायचा आहे. तर, दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे.
प्रणिती शिंदेंचा राजकीय प्रवास –
प्रणिती शिंदे यांनी जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या. तत्कालीन माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा पराभव त्यांनी केला. 2014 मध्ये भाजपची लाट असताना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला, तर 2019 मध्ये प्रणिती शिंदेनी आमदारकीची हॅट्रिक केली. सध्या प्रणिती या राष्ट्रीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे. आता 2024मध्ये काँग्रेसनं प्रणिती शिंदेना पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
राम सातपुते यांचा राजकीय प्रवास –
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ऊसतोड कामगारांचा मुलगा ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे. राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी राम सातपुते यांची ओळख आहे. राजकारणात नवखे असलेले राम सातपुते यांना माळशिरस मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी अनेक दिग्गजानी परिश्रम घेतले होते.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल –
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. यातील अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी अजित पवार गटात गेल्याने महायुतीची ताकद भक्कम झाली आहे. तर सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे आहेत.
सोलापुरातील जातीय समीकरण –
बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे. सोलापूर शहरात मराठी, तेलुगू आणि कन्नड मातृभाषा असणारे नागरिक राहतात. येथे मराठा आणि लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा लिंगायत बहुल मतदारसंघ आहे. त्यानंतर पद्मशाली समाज, मुस्लीम अनुसूचित जाती, धनगर समाज यांचा क्रमांक येतो. इथला लिंगायत समाज परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करत आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने धार्मिक कार्ड वापरत लिंगायत धर्मगुरू असलेल्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली. त्यात वंचित-एमआयएम युतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते, त्यामुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. ज्याचा थेट फटका काॅंग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदेना बसला होता.
2014 साली शरद बनसोडे आणि 2019 मध्ये जयसिद्धेश्वर स्वामींनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यावेळी लिंगायत समाजाचं एकहाती मतदान हे भाजपला पडलं होतं. 2014च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि 2019ला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. यंदाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदेंपुढे मतांचे हे विभाजन थांबवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. प्रकाश आंबेडकर हे INDIA आघाडीमध्ये गेले तर तिथे तिथली मत पुन्हा कॉंग्रेसला मिळतील. दलित मुस्लिम मतांचं विभाजण होणार नाही.
बाजी कोण मारणार?
प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही नेते तरुण आहे. दोघांचे भाषणकौशल्य चांगलं आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेची निवडणूक ही लढत चुरशीची होणार आहे. आक्रमक वक्तृत्व शैली असल्याने उमेदवारी जाहीर होताच आरोप-प्रत्यरोप सुरु झाले आहेत. मात्र उमेदवारांची वैयक्तिक ताकद, पक्षीय बलाबल, जातीय समीकरण हे सर्व पाहता निवडणुकीत बाजी कोण मारणार हे 4 जून रोजीच स्पष्ट होईल.
मतदारसंघातील प्रमुख समस्या –
सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे. सोलापूरच्या लोकांची आणि शेतीची तहान भागावी म्हणून हे धरण बांधण्यात आले. पण अजूनही सोलापूर शहरात आठवड्यातून एक किंवा दोनवेळाच पाईपलाईनद्वारे पाणी येते. उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे शहराला पाणी पुरवले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून समांतर पाईपलाईनचा प्रश्न रखडला आहे. त्याचे काम संथगतीने सुरू आहे. दुसरीकडे मोठे उद्योग आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण व्यवस्था नाही.
2019 च्या निवडणुकीचे निकाल –
भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी 5,24,985 (48.33%) मते मिळवून विजयी झाले होते. काॅंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे 3,66,377 (33.73%) मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. तर 1,70,007 (15.65%) मते मिळवून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते. 6,191 (0.57%) जणांनी नोटाचा पर्याय वापरला. एकूण मतदान 10,84,514 (58.57%) मतदान झाले होते.