अकोला – राज्यात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी आज म्हणजेच शुक्रवारपासून करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, राज्यातील वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेता काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन आज रात्री आठ वाजल्यापासून 15 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. आवश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहाणार आहे. तर, पेट्रोल आणि डिझेलही केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच दिले जाणार आहे.