कोल्हापूर : “समाजपुरुष अस्मितेवर जगत असतो, क्रांतिकारी कन्या हौसाबाई पाटील यांच्या जीवनावरील चरित्रात्मक साहित्यकृती अस्मिता जागवण्यासाठी उपयुक्त आहे” असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी काढले.
स्वरुप प्रकाशन, पुणे यांच्या वतीने डॉ.शोभा शिरढोणकर लिखित ‘ क्रांतिसिंह नाना पाटील यांची क्रांतिकारी कन्या हौसाबाई पाटील’ या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन डॉ.पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार सरनाईक होते,
यावेळी डॉ.पवार यांनी प्रस्तुत लेखिकेने राजमती पाटील, इंदुमती पाटणकर, विजयाताई लाड, भागिरथी तांबट या स्वातंत्र्य चळवळीतील रणरागिणींचे जिवनचरित्र प्रकाशात आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
समारंभाचे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक म्हणाले,वंशाचा दिवा केवळ मुलगाच असतो, असे नाही तर मुलगी सुध्दा वंशाचा दिवा असते,हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्येने दाखवून दिले आहे, हे पुस्तक घराघरात वाचले जावे, तसेच विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र व इतिहास विभागाच्या अभ्यासक्रमात समावेश व्हावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
प्रारंभी प्रा. डॉ. जे.के.पवार यांनी स्वागत केले, स्वरुप प्रकाशनचे एस.के.शिंदे यांनी प्रास्ताविक केले, लेखिका डॉ शोभा शिरढोणकर यांनी मनोगत व्यक्त केले, विजय शिंदे यांनी आभार मानले. यावेळी वसुधा पवार, प्रा.कल्पना गुरव, रवीन्द्र चव्हाण,उमेश जाधव, डॉ. विजयराव शिंदे आदी उपस्थित होते.