राजगुरूनगर – ई-पीक ही राज्य सरकाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतपीक 7/12वर अपडेट करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत फायद्याचा आहे, अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
वेताळे (ता. खेड) येथे महसूल विभागासह कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावतीने ऑनलाइन 7/12 उताऱ्यावर पिकांची नोंदणी ई-पीक ऍपच्या प्रणाली माध्यमातून नोंदणी पद्धतीचा आढावा विभागीय आयुक्त राव यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन घेतला.
वेताळे येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून मोबाइल ऍपद्वारे ई-पीक पाहणीची नोंदणी करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी सातबारा अपडेटमधील त्रुटी आणि अडचणी समजावून घेऊन त्यात मार्ग काढण्यात आला. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍपद्वारे अपडेट करावी, असे आवाहन राव यांनी केले.
वेताळे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजीत दौऱ्या निमित्ताने भेटीसाठी आलेले पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकार डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे यांचा सरपंच सविता बोंबले, उपसरपंच योगेश बोंबले, बंडोपंत बोंबले, बाबाजी वांळुज आदिच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
“ई-पीक ऍपच्या माध्यमातून नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत. यासाठी जास्तीत महाविद्यालयीन युवक-युवतींनी आपल्या गावाच्या शेतकऱ्यांना अँडरॉंइड मोबाइलद्वारे ई-पीक नोंदणी करून देऊन सहकार्य करावे.”
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी