सातारा (प्रतिनिधी) – येथील एन. बी. फिटनेस ग्रुपच्या नऊ शिलेदारांनी अतिशय कठीण अशा लिंगाणा किल्यावर प्रजासत्ताक दिनी यशस्वी चढाई केली. तब्बल 3100 फूट उंचीवरील या किल्ल्यावर जाऊन या ट्रेकर्सनी तिरंगा फडकावला.
या ग्रुपच्यावतीने साहसी मोहिमा आखल्या जातात. यंदा प्रजासत्ताकदिनी लिंगाणा मोहीम फत्ते करण्याचा निर्धार या ग्रुपच्या सदस्यांनी केला होता. त्यानुसार नऊ ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यामध्ये सातारा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील वर्ग-2 चे कर्मचारी दत्तात्रय मोहिते, पराग सुभेदार, महादेव निकम, किरण निकम, मंदार मुरुडकर, विशाल पाटील, शुंभागी मुरुडकर, अखिलेश मुरुडकर व कौस्तुभ मुरुडकर यांचा समावेश होता.
लिंगाणा किल्ला सर करायला अतिशय अवघड आहे. हा किल्ला सरळ रेषेत असल्याने त्यावर चढाई करणे सोपे नाही; परंतु सातारच्या शिलेदारांनी हे आव्हान स्वीकारून मोहीम फत्ते केली.
आम्ही पहाटे 4 वाजता लिंगाणा किल्ला चढायला सुरुवात केली. रोप क्लायम्बिग करत सकाळी 10 च्या सुमारास आम्ही लिंगाणाच्या टोकावर पोहोचलो. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज व भारतमाता यांच्या जयजयकाराच्या घोषणा आसमंत दुमदुमून टाकला. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायल्यावर किल्ला उतरायला सुरुवात केली.
रॅपलिंग करत आम्ही दुपारी 1.45 वाजता बेस कॅम्पला पोहोचलो, अशी माहिती सहभागी ट्रेकर्सनी दिली. या यशस्वी मोहिमेबद्दल नितीश भोसले, राम हादगे आदींनी ट्रेकर्सचे अभिनंदन केले.