प्रकाशवाटा

एकदा अकबर बादशहानं भर दरबारात विचारलं, “सत्तावीसातून नऊ गेल्यावर किती उरतात?’ साऱ्या दरबारानं एकमुखानं “अठरा’ असं उत्तर दिलं. एकट्या बिरबलानं मात्र “शून्य’ असं उत्तर दिलं. एकट्या बिरबलानं मात्र “शून्य’ असं सांगितल्याने अर्थातच सगळा दरबार बिरबलावर खवळला. बादशहानं विचारलं, “शून्य कसं काय?’ बिरबल शांतपणे म्हणाला, “सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर उरतं तरी काय? फक्त दुष्काळच’. हे उत्तर ऐकून बादशहानं नेहमीप्रमाणे बिरबलाचं कौतुक केलं. दरबार गप्प बसला.

पावसाळा येतो तोच मुळी नवजीवनाची चाहूल घेऊन धरती तप्त झालेली असते-जनावरं, झाडं, माणसं सगळेच पाणी, पाणी करत असतात. आकाशातून सूर्य आग ओकतच असतो.

वृक्षाच्या सावलीला बसून जनावरं रवंथ करतात. माणसं भाकरतुकडा खातात, विश्रांती घेतात. कपाळावर आडवा हात धरल्याशिवाय निभत नाही, अंगांगातून घामाच्या धारा वाहत असतात.

मग एक दिवस पश्‍चिमेकडे काळे ढग जमायला लागतात, धूळ, पालापाचोळा उडायला लागतो, जोराचा वारा सुटतो आणि अचानक एका क्षणी पावसाचे थेंब पडायला लागतात. पावसाच्या थेंबांसाठी आसुसलेली मनं फाटलेली धरती तृप्त होते. मातीचा सुगंध येतो.

नवजीवनाचा हा साक्षात्कार प्रत्येक जीवाला हवाहवासा असतो. तो दरवर्षी येणारा असला तरी तितकाच नवा वाटतो मन ताजं प्रफुल्ल करून टाकतो.

नवजीवन प्रत्येकाला हवंच असतं. त्यासाठीच आपण धडपडत असतो. गेल्या पिढीतले नामवंत साहित्यिक वि.स. खांडेकर म्हणतात, “प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रसंगानंतर माणसाचं मन मरून परत परत जन्म घेत असतं. ही पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची क्रिया थांबणं हेच मरण.’

तसा तर रोज नव्यानं उगवून तो गगनराज नवजीवन देतच असतो. पहाटेचे ते क्षण विलक्षण असतात. खरं तर रोजच अनुभवण्याजोगे असतात. पाखरं किलबिलत असतात. आपलं, पिल्लांचं पोट भरायला ते निळ्या आकाशात भरारतात. दूधवाले, पेपरवाले, घराघरातल्या गृहिणी यांची कामं तर भल्या पहाटे, ब्राह्ममुहूर्तावर सुरू होतात.

काही महाभागांना झोपच अतिप्रिय असते. दाराशी येणारं ताजं, प्रफुल्ल नवजीवन ते नाकारतात. पडदे खिडक्‍या लावून सूर्य उजाडला तरी कृत्रिम अंधार करून डाराडूर झोपून राहतात. खरं तर त्यांच्याइतके दुर्दैवी आणि अभागी तेच.
दिवसभर श्रमल्यानंतर आपलं शरीर आळसावतं, डोळे मिटायला लागतात, अंग दुखत असतं, पण रात्रभरच्या झोपेनंतरच ते आपोआपच जाणवतं. त्याला गजराची गरजच पडत नाही. आता मोबाईलच्या युगात चिमण्यांची चिवचिव ऐकू येईनाशी झालेय. पण पक्ष्यांची गाणी तर ऐकू येतात?

पूर्वी रेडिओवर अभंगवाणी, भक्तिसंगीत असं ऐकू यायचं. आता टीव्ही आणि मोबाईलच्या युगात सकाळी सकाळी उठून एखादा युवक टीव्हीवर सिनेमातली गाणी किंवा बातम्या लावतो. अनेकजण उठल्याउठल्या मोबाईल “चेक’ करतात. असो.
पावसानं धरतीला, वृक्षांना, पीकपाण्याला नवजीवन मिळतं. तसंच आपल्याही मनातली निराशा, खंत, बोचणी निघून जाते. नव्या कामाचा उत्साह येतो. जरा सकाळचा चहा प्यायल्यावर घराबाहेर पडून लांबवर चक्कर मारली तर आळस पळून जातो. आपलेही पाय वेगात पडायला लागतात, अगदी धावायलाही!

त्यांना वाटलं तर धावू द्यावं, दमल्यावर झाडाखाली किंवा बागेतल्या बाकावर बसावं. झाडाखाली पडलेल्या, झाडावर उमललेल्या फुलांना नाजूक तळहातावर घ्यावं. त्यांचा सुगंध नाकात भरून घ्यावा. या सगळ्यानं नवजीवनच मिळत असतं.
नवजीवन छोट्या छोट्या गोष्टीत असतं. रोज छोट्या मुलाशी बोलण्यात, फुलाच्या सुगंधात, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारण्यात, लांबवर चालत जाण्यात, रात्रीच्या शांत प्रहरी जुन्या हिंदी चित्रपटांची गाणी ऐकण्यात, जमिनीवर पडून आकाशातले तारे पाहण्यात, आपल्या आवडीचं पुस्तक गुंग होऊन वाचण्यात. नवजीवन म्हणजे उर्जेचं शरीरात सळसळणं. आळस, निराशा, एकटेपणा दूर होणं- त्यासाठी अशा खूप छोट्या गोष्टीसुद्धा नक्की उपयोगी पडतात.

येशू ख्रिस्तांना शुक्रवारी सुळावर चढवलं. आणि तीन दिवसांनी त्यांचा पुनर्जन्म झालं, त्यांना नवजीवन मिळालं असं ख्रिश्‍चन मानतात.

म. गांधींनाही कोणी गोळ्या घातल्या पण कोणीतरी म्हटलंय तसंच “महापुरुष मरत नसतात त्यांच्या कार्याच्या रूपानं ते अमर होत असतात.’ म्हणूनच गेल्या महिन्यात एका वक्‍त्यांनी वसंत व्याख्यानमालेत “आजही गांधी का आठवतात?’ यावर भाषण दिलं.

म्हणून जीवनाला सतत सामोरं जायचं, रोज येणाऱ्या नव्या नव्या आव्हानांना मनापासून भिडायचं. निराशा आलीच तर परत नवजीवन, नवसंजीवनी मिळवायची.

Leave A Reply

Your email address will not be published.