माहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंडिया’ बनणे शक्य होणार? (भाग १)

महेश कोळी

कथा-कहाण्यांमध्ये जादूच्या सहाय्याने अदृश्‍य होण्याचे प्रसंग असतात. ते केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही आकर्षित करतात. खरोखर गायब होता आले तर..? असे रोमहर्षक स्वप्न अनेकांना पडते. त्यामुळेच जगभरातील शास्त्रज्ञही अशा एखाद्या तंत्रज्ञानाच्या किंवा पदार्थाच्या शोधात गुंतले आहेत, ज्याचा वापर करून अदृश्‍य होता येईल. या प्रयत्नांत काही प्रमाणात यशही मिळाले आहे. परंतु पूर्णपणे अदृश्‍य होण्याची किमया विज्ञानाला कधी करून दाखविता येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्टर इंडिया’ नावाचा अनिल कपूर यांची भूमिका असलेला चित्रपट काही वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. एका विशिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने अनिल कपूर अदृश्‍य होऊ शकतो आणि खलनायकाला सळो की पळो करून सोडतो, असे या चित्रपटात दाखविले आहे. हा काही बालपट नव्हता. सर्व वयातील व्यक्तींनी या चित्रपटाचा आस्वाद मनमुराद घेतला होता. गायब होणे, अदृश्‍य होणे या बाबी लहान मुलांसाठीच्या काल्पनिक गोष्टींमध्ये येत असल्या, तरी सर्वांनाच त्याचे आकर्षण असते. अदृश्‍य होता आले तर आपण काय-काय करू, असे स्वप्न अनेक मंडळी रंगवत असतात. रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांमधून अदृश्‍य होण्याच्या शक्तीचा उल्लेख सापडतो. राम-रावण युद्धात रावण अनेकदा अदृश्‍य होत होता, असे सांगितले जाते. गायब होणे हे फॅण्टसी आहे. मिस्टर इंडिया असो वा हॅरी पॉटरच्या कहाण्या असोत, गायब होण्याची क्षमता त्यात दाखविली जाते ती अतिशयोक्ती म्हणूनच. एकोणीसाव्या शतकात प्रसिद्ध वैज्ञानिक कथाकार एच. जी. वेल्स यांनी “इन्व्हिजिबल मॅन’ म्हणजेच “अदृश्‍य माणूस’ ही कादंबरीही लिहिली होती. थोडक्‍यात, गायब होणे ही माणसाची शतकानुशतकांची फॅण्टसी आहे. विज्ञान फारसे विकसित झाले नव्हते, तेव्हाही माणूस गायब होण्याची कल्पना करीत होता आणि आज विज्ञान प्रचंड वेगाने विकसित होत असताना खरोखर गायब होण्यासाठी माणसाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु प्रश्‍न असा की, हे कसे काय शक्‍य होणार?

कथा-कादंबऱ्या आणि प्राचीन वाड्‌.मय वगळून आपण विज्ञानाकडे लक्ष केंद्रित केले तर सध्या तरी असे दिसते की पूर्णपणे अदृश्‍य होणे माणसासाठी अद्याप दिवास्वप्नच आहे. कारण माणसाला गायब करू शकणाऱ्या मेटाफ्लेक्‍स नावाच्या ज्या पदार्थाची निर्मिती शास्त्रज्ञ करीत आहेत, त्यात त्यांना पूर्णपणे यश आलेले नाही. हा पदार्थ तयार झाल्यास त्याचा गाऊन तयार करून माणसाला परिधान करणे आणि त्याला अदृश्‍य करणे हे शास्त्रज्ञांचे उद्दिष्ट आहे. हा “इन्व्हिजिबल गाऊन’ अद्याप तयार होऊ शकलेला नाही. वस्तुतः मेटा हा एक असा लवचिक पदार्थ आहे, ज्याची वेव लेन्थ खूपच कमी असते. त्याचे कारण म्हणजे, हा पदार्थ खूपच छोट्या अणूंच्या स्वरूपात आढळून येतो. अशाच छोट्या अणूंपासून तयार होणाऱ्या पदार्थांचा गाऊन तयार करून अदृश्‍य होण्याची संकल्पना मांडली जात आहे. परंतु काही वर्षांपूर्वी स्कॉटलंड सेन्ट ऍन्ड्रयू विद्यापीठात मेटाफ्लेक्‍सवर अनेक वर्षे संशोधन केल्यानंतर, माणूस पूर्णपणे अदृश्‍य होणे अवघड असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. एक गोष्ट मात्र खरी. ती म्हणजे, अनेक वर्षांपासून या दिशेने सातत्याने संशोधन सुरू आहे आणि त्याच्या परिणामी आपल्याला माणूस खरोखर अदृश्‍य होऊ शकतो का, या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकते. वास्तविक, मेटाफ्लेक्‍स हा पदार्थ 620 नॅनोमीटरच्या वेवलेन्थद्वारा संचालित केला जातो. ही वेवलेन्थ दृश्‍य प्रकाश असलेल्या क्षेत्रात सक्रिय होते आणि त्यामुळे या पदार्थाने झाकलेली वस्तू प्रकाशात दिसत नाही.

याचा अर्थ असा की, या पदार्थापासून बनविलेला गाऊन एखाद्या व्यक्तीने परिधान केला आणि त्यावर सूर्यप्रकाश पडला, तर ती व्यक्ती दिसू शकणार नाही. परंतु या गाऊनला स्पर्श करून प्रकाशकिरण जेव्हा आत जातील आणि गाऊन घालणाऱ्या व्यक्तीवर पडतील, तेव्हा त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. त्यामुळे सर्व प्रयत्नांवर पाणी पडेल. म्हणजेच अदृश्‍य होऊ पाहणारी व्यक्ती पकडली जाईल. त्याच्या शरीरातून प्रकाशकिरण आरपार जाऊ शकत नाहीत. तरीसुद्धा या पदार्थाला शास्त्रज्ञांनी “स्मार्ट फॅब्रिक’ असे नाव दिले आहे. मात्र, अदृश्‍य होण्याची कल्पना ही अद्याप दिवास्वप्नच आहे, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

माहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंडिया’ बनणे शक्य होणार? (भाग २)

 

Leave A Reply

Your email address will not be published.