युतीबाबत इतरांनी तोंड घालू नये – उद्धव ठाकरे

-मुख्यमंत्रीपदावरून वादाची ठिणगी 

-निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपाचाच – सरोज पांडे

मुंबई – विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे वक्तव्य महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबत ठरले आहे. इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये अशी प्रतिक्रीया दिली आहे.

शिवसेनेकडून भावी मुख्यमंत्री म्हणून युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे ढकलले जात असतानाच भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा दाखवला गेल्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या नेत्यांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या भाषणात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशी घोषणा सरोज पांडे यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता मुख्यमंत्री कोण होणार हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ठरले आहे असे सूचक उत्तर दिले आहे. तर लोकसभा निवडणुकीत जे यश मिळाले त्यामुळे भाजपाच मोठा भाऊ आहे असे वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केले आहे. आता या सगळ्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद होणार अशी लक्षणे दिसायला लागली आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे. असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्दयालाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भाजपच्या अन्य नेत्यांनी लक्ष न घालण्याची सूचनाही केली आहे.

शिवसेनेचा वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटले होते. मुख्यमंत्री कोण होणार? पुढे काय होणार याची चिंता तुम्ही करू नका आमचे सगळे काही ठरले आहे असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण होण्यापूर्वीच मिटवण्याचा प्रयत्नही केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा विषय तूर्तास गौण आहे असेही ते म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.