मुंबई: करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एका पोलिसाने गायलेले एक चित्रपटगीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारों… हे ते गीत आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक निर्बंध झुगारून बेजबाबदार वर्तन करत असल्याचे यातनादायी चित्र समोर येत आहे. त्यापार्श्वभूमीवर, एका पोलिसाने बॉलीवूड अभिनेता आमीर खान याच्या सरफरोश या चित्रपटातील गीताची केलेली निवड अनेकांना भावली आहे. त्या व्हिडीओतून संबंधित पोलिसाने नागरिकांना घरीच थांबण्याचे प्रभावी आवाहन केले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही पोलिसाची ती कृती आवडली. देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून पोलिसाचा व्हिडीओ पोस्ट केला. महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबलची सुमधुर विनवणी जनता ऐकेल अशी आशा करूया, अशी टिप्पणीही देशमुख यांनी केली.