मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीचा शेअरी 5 दिवसापासून घसरण चालूच असून आता या शेअरचा भाव 777 रुपयांवर आला आहे. या घसरणीसह एलआयसीचे बाजार मुल्य पाच लाख कोटींपेक्षाही कमी झाले आहे.
शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आजही एलआयसीच्या शेअर दरात 3 टक्क्यांची घसरण झाली. एलआयसी आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे.
एलआयसीने आपल्या शेअरची किंमत 949 रुपये प्रति शेअर इतकी निश्चित केली होती. आता एलआयसी गुंतवणुकदारांना 165 रुपये प्रति शेअर नुकसान झाले आहे. गुंतवणुकदारांचे जवळपास एक लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
या दरम्यान, ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलने एलआयसीला 875 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. ब्रोकरेज फर्मने एलआयसीला हत्ती संबोधत हत्तीकडून नृत्याची अपेक्षा करू नये असे म्हटले होते.
दरम्यान एलआयसीने शेअर बाजारातून 42 हजार कोटींचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात एलआयसीची ही कमाई झाली आहे. त्याआधी वर्ष 2020-21 मध्ये एलआयसीने 36 हजार कोटींचा नफा कमावला होता.
एलआसी ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते.