तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने येथील नागरिक ,शेतकरी भयभीत झाले आहे.शनिवार दि.२९ च्या पहाटे तीन च्या सुमारास तळेगाव ढमढेरे येथील बाळासाहेब ढमढेरे यांच्या घराची राखण करणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला .हा थरार ढमढेरे यांच्या घराच्या सभोलताली लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याने हल्ला केलेला बिबट्या असल्याची खात्री झाली.
तळेगाव ढमढेरे परिसरात भिमाशेत,चौधरी वस्ती ,ढमढेरे वस्ती या लोकवस्तीत सलग तीन दिवस तीन ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले.सायंकाळी ७ च्या नंतर हा बिबट्या शिकारीच्या शोधात बाहेर पडत असल्याचे येथील ग्रामस्थ बोलत आहे.दोन दिवसापूर्वी बाळासाहेब ढमढेरे यांचेच पाळीव कुत्र्यावर हल्ला करून फस्त केले .आज पहाटेच्या सुमारास पुन्हा दुसऱ्या कुत्र्यावर हल्ला केला .
बिबट्याने मनुष्यवस्तीकडे मोर्चा वळविल्याने पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे.ग्रामीण भाग असल्याने रात्री अपरात्री शेतकरी वर्ग शेतात काम करायला ,पाणी धरायला जातात .त्यावेळी बिबट्याचे सतत दर्शन होत आहे.
या भागात ऊसशेती मोठ्या प्रमाणात असल्याने हा बिबट्या दिवसभर आरामासाठी ऊसाचा आसरा घेतो .त्याचबरोबर रानात भटकणाऱ्या पाळीव कुत्री ,रानडुक्कर प्राण्यांना भक्ष्य करून उदरनिर्वाह करतो.परंतु एप्रिल -मे च्या दरम्यान ऊस कमी झाल्याने त्यामुळ बिबट्याचे नागरिकांना मनुष्य वस्तीत तसेच रानात काम करणाऱ्या महिला ,कामगारांना वारंवार दर्शन होत आहे.या भीतीने रानात काम करण्यासाठी मजूर ,महिला नकार देत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.जीवितहानी होण्याच्या आधी वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहे .
“तळेगाव ढमढेरे परिसरात हा बिबट्या अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे.भक्ष्यक मिळत नसल्याने रात्रीच्या वेळी शिकारीसाठी मानववस्तीत शिरत आहे.आमच्या परिसरातील पाळीव कुत्र्यांचा फडशा त्याने पाडला आहे.पंधरा दिवसापूर्वी याच भागात दुचाकी वरून येणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला केला होता .वनविभागाने याची वेळीच दक्षता घ्यावी.”
बाळासाहेब ढमढेरे ,शेतकरी तळेगाव ढमढेरे
“तळेगाव ढमढेरे येथे ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे .त्या सर्व ठिकाणी वनकर्मचारी ,अधिकारी यांनी पाहणी केली असून तातडीने पिंजरा उपलब्ध करून पुढील कार्यवाही केली जाईल .रात्रीच्या वेळी शेतात काम करताना बँँटरीचा वापर करावा तसेच मोबाईलचा ध्वनी चालू ठेवावा .”
मनोहर म्हसेकर ,वनअधिकारी ,शिरूर