पुणे -जन्मजात हृदयरोग, दुभंगलेले ओठ यासह मेंदू, दात, कान हाडांचा त्रास असूनही आर्थिक परिस्थितीमुळे गरीब किंवा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या जात नाही. त्यामुळे कायचे व्यंग किंवा मृत्यु ओढावतो. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत आता या मुलांवर शस्त्रक्रिया होणार असल्याने खऱ्या अर्थाने गरीब कुटुंबासाठी आशेचा किरण मिळाला आहे.
शून्य ते 18 वयोगटातील सर्वच बालकांवर याप्रकरणाच्या मोठे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पुण्यातील नऱ्हे येथील काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. त्याबाबतचा करार नुकताच पार पडला. अशी माहिती कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी दिली. त्यामध्ये जन्मजात हृदयरोग, अस्थिरोग शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया, दातांची शल्यचिकित्सा, कानाचे उपचार आणि डोळ्यांचे उपचार मोफत होणार आहेत.
खासगी रुग्णालयात याच शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. काही कुटुंब आपली जमीन, दागिने, आहे ती संपत्ती गहाण ठेवून मुलांचे उपचार करतात. मात्र, अनेक कुटुंबांकडे गहाण ठेवून शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळतील एवढी संपत्तीही नसते, असा कुटुंबातील गरजू मुलांवर शस्त्रक्रिया करायची कशी असा प्रश्न निर्माण होतो. बराचवेळा शस्त्रक्रिया न झाल्यामुळे मुलांमध्ये कायमचे व्यंग राहते, तर काही मुले दगावतात. अशा परिस्थितीत “आरबीएसके’मुळे या गरजू मुलांना जीवदान मिळणार आहे.
उपचार कसे मिळवायचे…
हे उपचार मिळण्यासाठी संबंधित आरबीएसके डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी. त्यामध्ये शून्य ते 18 वयोगटातील सर्व बालके पात्र असतील, त्यासाठी बालकाचा शाळा शिकत असलेला अंगणवाडी किंवा शाळेचा दाखला, डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्रक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची मंजुरी ही कागदपत्रे लागतील. हे उपचार पुण्यासह नाशिक, वर्धा आणि मुंबईतही होतात.
काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाल्या असून, औंध जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सकांचे मंजुरी पत्र घेऊन येणाऱ्या मुलावरही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
– डॉ. मधुकर जगताप निवृत्त सहायक उपसंचालक, आरोग्य विभाग