- काळाने घातला घाला
पिंपरी – मुलाचा पहिलाच वाढदिवस एकत्र साजरा करायचा होता. मात्र, कामावरून सुटी न मिळाल्याने वाढदिवसाला गावी जाण्याचे राहूनच गेले. मुलाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना केएसबी चौक येथे गुरुवारी (दि. 14) दुपारी घडली.
गजानन नारायण काळे (रा. संतकृपा हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गजानन काळे हे पिंपरीतील एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहेत. गुरुवारी दुपारी ते सेकंडशिपला कामाला जाण्यासाठी चिखलीहून आपल्या दुचाकीवरून निघाले. ते केएसबी चौक येथील पुलावर आले असता (एमएच-14-एएस-9121) या डंपरने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात गजानन हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालक देवराम गोपीनाथ राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तीन वर्षांपूर्वी गजानन यांचा विवाह झाला. गेल्यावर्षी त्यांना मुलगा झाला. बुधवारी (दि. 13) त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. यासाठी गजानन यांना गावी जायचे होते. मात्र लॉकडाऊननंतर कंपनी सुरू झाल्याने त्यांना सुट्टी मिळाली नाही. यामुळे मुलाच्या वाढदिवसाला गावी जाण्याची इच्छा हे स्वप्नच राहिले. गजानन यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
रुग्णालयाच्या भूमिकेबाबत संताप
जखमी गजानन यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र आधी पैसे भरा मगच उपचार सुरू करतो, अशी भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली. मात्र रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी काशिनाथ शेलार यांनी पहिले उपचार सुरू करा, पैसे भरतो, असे सांगितल्यावर उपचार सुरू केले. त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने पैशासाठी काळे यांच्या कुटुंबीयांच्या मागे तगादा लावला. उपचारादरम्यान त्यांना पैसे न भरल्याने बाहेरही काढले. अखेर नातेवाइकांनी डंपरच्या मालकाशी संपर्क साधून काळे कुटुंबीयांच्या आर्थिक स्थितीबाबत सांगितले. डंपरच्या मालकाने रुग्णालयात पैसे भरल्यानंतर पुन्हा उपचारास सुरवात केली. सायंकाळी उशिरा गजानन यांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयाच्या या भूमिकेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.