पुणे – एलईडी बल्बच्या काही सुट्या भागांची आयात चीनमधून होते. मात्र, करोना व्हायरसमुळे यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एलइडी बल्ब 10 टक्क्यांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे.
ही माहिती एलईडी बल्ब उत्पादकांची संघटना असलेल्या “एल्कॉमा’ने दिली आहे. संघटनेचे उपाध्यक्ष सुमित जोशी यांनी सांगितले, “इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाप्रमाणेच एलइडी बल्ब तयार करणाऱ्या उद्योगावर चीनमधील घडामोडींमुळे परिणाम झाला आहे. छोट्या एलईडी बल्बपेक्षा मोठ्या कार्यक्रमात वापरले जाणारे मोठे एलईडी बल्ब महाग होण्याची अधिक शक्यता आहे.
आयातीच्या ऑर्डर मंदावण्याची शक्यता आहे. सध्याचा माल फेब्रुवारीअखेरपर्यंत पुरू शकतो. मात्र, मार्चनंतर पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. आता एखाद्या महिन्यात परिस्थिती सुधारण्याची शक्यता मंदावली आहे. आम्ही या बाबी अर्थमंत्रालयास सांगितल्या आहेत. तैवान, हॉंगकॉंग, दक्षिण कोरियाकडून ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,’ असे जोशी म्हणाले.