* पावसाच्या फटक्याने उत्पादनासह आवक घटली
* बाजारात तुटवडा, चांगल्या मालाला मागणी
* सततच्या भाववाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
पुणे – मान्सून माघारी फिरला असला, तरी राज्यात पाऊस सुरू आहे. अवेळी होणाऱ्या पावसाचा फटका पालेभाज्यांना बसला आहे. पालेभाज्या खराब झाल्या आहेत. बाजारात सध्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याने दुय्यम प्रतीच्या भाज्या अधिक प्रमाणात दाखल होत असून, किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक, शेपू, कांदापात या पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत.
उन्हाळ्यात पालेभाज्या तेजीत असतात. कारण पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणपणे नवरात्रोत्सवानंतर पालेभाज्यांचे नवीन पीक हाती येते. मात्र, यंदा पावसाने उसंत न घेतल्याने पालेभाज्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाल्याची माहिती किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.
दिवाळीच्या आसपास पालेभाज्यांचे भाव उतरतात. पालेभाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात. एका जुडीचा भाव साधारपणे 10 ते 15 रुपयांपर्यंत राहतो. अवेळी पावसामुळे पालेभाज्यांचे पीक हाती येण्यापूर्वीच खराब झाले आहे. त्यामुळे दुय्यम प्रतवारीच्या पालेभाज्यांना बाजारात चांगले भाव मिळाले आहेत. सध्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या पालेभाज्यांची प्रतवारी तितकीशी चांगली नाही. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तेजीत असल्याने किरकोळ बाजारात भाव चढेच असल्याचे ढमढेरे यांनी सांगितले.
सासवड, हडपसर, उरूळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. मुंबईतील बाजारात नाशिक भागातील पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. यात मेथी, कोथिंबीर, मुळा, पालक, कांदापात, शेपू या पालेभाज्यांना मागणी असते. त्यातुलनेत चवळई, करडई, अंबाडी, चुका, पुदिना या पालेभाज्यांना तशी कमी मागणी असते, असे त्यांनी सांगितले.
किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे भाव
कोथिंबीर 40 ते 60 रुपये
मेथी 25 ते 30 रुपये
मुळा 30 ते 35 रुपये
पालक 40 ते 45 रुपये
शेपू 20 ते 25 रुपये
कांदापात 25 ते 30 रुपये
पुढील दोन ते तीन दिवस पाऊस असाच राहिला, तर पालेभाज्यांचे मोठे नुकसान होईल. पालेभाज्यांची पुन्हा लागवड केल्यानंतर साधारणपणे महिनाभरात नवीन पीक हाती येईल. त्यामुळे पुढील महिनाभर तरी पालेभाज्या तेजीत राहणार आहेत.
– प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते