नुकसानग्रस्त भागांत पुढाऱ्यांच्या दौऱ्यांचा सपाटा

थेट बांधावर जात शेतकऱ्यांना देताहेत दिलासा : हातातोंडाशी आलेला घास हिरावला

पुणे – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या नुकसानीचा येत्या दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र, आता जनतेशी आपली नाळ घट्ट असल्याचे दाखविण्यासाठी नेत्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या भागांना भेट देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आपल्याला लवकरच नुकसान भरपाई मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा वाटू लागली आहे.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील हातातोंडाशी आलेले पीक जवळपास हातचे गेले आहे. हे जिल्हे वगळता पश्‍चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांबरोबरच कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हाती आलेले पीक मुसळधार पावसाने भूईसपाट झाले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. नेतेमंडळी सत्तेची नवी समीकरणे तयार करण्यात मश्‍गुल होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला आहे की नाही, अशी राज्यात परिस्थिती होती. नेमकी ही बाब हेरुन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यात शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा सुरू केला.

त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील पीक पाहणी दौरा सुरू केला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यतील बहुतांशी सर्वच आमदार- खासदारांचा समावेश आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह ही नेतेमंडळी शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.

पुणे जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अतुल बेनके, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर नुकसानभरपाई कशी मिळेल व जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे या नेत्यांनी भेटीप्रसंगी शेतकऱ्यांना सांगितले.

नेतेमंडळी सत्तेची नवी समीकरणे तयार करण्यात मश्‍गुल

विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात प्रत्येक राजकीय पक्षाने शेतकरी घटकाला महत्त्व दिले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या घटकाला कोणत्या समस्या भेडसावत आहेत, याकडे लक्ष द्यायला कोणत्याच राजकीय पक्षाकडे वेळ नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे आता सर्वच नेते मंडळी आपल्या मतदारसंघातील पीक नुकसानीचा दौरा करताना दिसत आहेत.

नुकसानभरपाई लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू

कृषी विभागाचे काम युद्धपातळीवर सुरू  –
राज्याच्या कृषी विभागाला 6 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील पिक नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे हा विभाग खडबडून जागा झाला आहे. शेतीची पाहणी करून सातबाऱ्यावरील नोंदीनुसार झालेल्या पिकांच्या लागवडीचे क्षेत्र निश्‍चित करून नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे काम या विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)