पुणे – वकिलांनी कायद्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. फोजदारी प्रॅक्टिस करताना पुरावा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला पाहिजे. प्रकरण चालवत असताना आजूबाजूच्या घडामोडींकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. बऱ्याचदा समाजातल्या गोष्टींचा सुद्धा प्रकरण चालविण्यास लाभ होतो. त्याचबरोबर प्रत्येक न्यायाधीशाची पद्धत वेगवेगळी असते. न्यायाधीश मंडळींच्या अनुषंगाने प्रकरण चालवले पाहिजे, असे मत फोजदारी क्षेत्रातील विधीज्ञ ऍड. विपुल दुशिंग यांनी व्यक्त केले.
पुणे बार असोसिएशनतर्फे ऍड. दुशिंग यांच्या “क्रिमिनल ट्रायल’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ऍड. अमोल शितोळे, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, हिशेब तपासणीस ऍड. शिल्पा कदम आणि कार्यकारिणी सदस्य ऍड. काजल कवडे, ऍड. अमोल भोरडे, ऍड. अमोल दुरकर, ऍड. अजय नवले, ऍड. तेजस दंडगव्हाळ, ऍड. रितेश पाटील उपस्थित होते.
ऍड. दुशिंग म्हणाले की, नवोदित वकीलांनी कोर्ट रूममध्ये बसले पाहिजे व प्रकरणाचे कामकाज पाहिले पाहिजे. प्रत्येक वकिलांनी फावल्या वेळेत आपल्या इतर बांधवांची उलटतपासणी, पुरावा पाहिला पाहिजे. जेणेकरून आपल्याला वकिली करताना त्या ज्ञानाचा उपयोग होईल.
ऍड. थोरवे म्हणाले की, तज्ज्ञ वकिलांच्या ज्ञानाचा उपयोग इतर वकील बांधवांना व्हावा व त्यांचा वकिली व्यवसाय उन्नती व्हावी, या हेतूने आज या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनच्या सचिव ऍड. सुरेखा भोसले यांनी केले. तर उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे यांनी आभार मानले.