हडपसर : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हडपसरमधील विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी बंदची हाक देण्यात आली होती. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले होते. याला हडपसर व मांजरी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार चेतन तुपे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने हडपसर गाव, वेशीसमोर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी वानवडी ते हडपसर गाव मोर्चा काढून निषेध नोंदवला व बंदला पाठिंबा दर्शविला. यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले होते.
हडपसर, मांजरी परिसरातील अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा बंदला आज पाठिंबा मिळाल्याचे पहायला मिळाले. मांजरी बुद्रुक येथील आण्णासाहेब मगर उपबाजारात तसेच हडपसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केटमध्ये शुकशुकाट होता. मांजरी बुद्रुक-शेवाळेवाडी येथील पीएमपीएलचे आगारही बंद होते. याशिवाय गाडीतळ येथील पीएमपी बसस्थानकात बसेस नसल्याने अगदी तुरळक गर्दी दिसून आली. पुणे- सोलापूर महामार्गालगत असलेली सर्व दुकाने बंद होती. दुपारी काही मार्गावरील बसेस सुरू करून प्रवासाची सोय करण्यात आली होती. हडपसर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.