पुणे – नेशन वाईड लॉयर्स क्रिकेट संघटना आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व्या वकीलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे पुण्यामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व वकील यांचा समावेश असलेले १२ राज्यातील संघ आणि २०० खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे संचालक अॅड. उमेश चांडोले, अॅड. गुरू काळोखे आणि अॅड. विवेक देशमुख यांनी दिली.
गेल्या २५ वर्षांपासून या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन देशातील विविध राज्यांमध्ये करण्यात आले आहे. देशातील न्यायाधीश वर्ग आणि वकील वर्ग यांचा सहभाग असलेली ही मानाची स्पर्धा पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत असून पुणे शहराला या स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. विविध राज्यातील २०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
ही वकीलांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा टी-२० षटकांची असणार असून ही स्पर्धा २५ ते २९ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहेत. या स्पर्धेचे सामने पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब, शिंदे हायस्कूल मैदान-सहकारनगर, मोशी येथील हजारे स्पोर्ट्स क्लब आणि चिंचवड येथील व्हेरॉक दिलीप वेंसरकर क्रिकेट अकादमी या मैदानांवर होणार आहेत. स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेला वैंकाब आणि नॅशनल एग्ज को-ऑरडीनेशन कमिटी (एनईसीसी) यांनी प्रायोजकत्व दिले आहे.
स्पर्धेमध्ये सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया, दिल्ली हायकोर्ट संघ, ओरीसा हायकोर्ट संघ, पाँडेचरी हायकोर्ट संघ, पंजाब आणि हरयाणा हायकोर्ट संघ, चेन्नई हायकोर्ट संघ, केरळ हायकोर्ट संघ, कर्नाटक हायकोर्ट संघ, अलाहाबाद हायकोर्ट संघ, तेलंगाणा हायकोर्ट संघ, आंध्रप्रदेश हायकोर्ट संघ आणि आयोजक महाराष्ट्र हायकोर्ट संघ असे १२ संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत. स्पर्धेचे उद्धघाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्जल भुय्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गडकरी, न्यायाधीश मोडक, आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. विजय, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार रोहीत पवार व अॅड. राजेंद्र उमाप आदि उपस्थित राहणार आहेत.