पुणे – अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित १८ व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत शहरांतील नामांकित आयटी क्षेत्रातील 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा २३ डिसेंबर पासून पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु होणार आहे, अशी माहिती अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष विंग कमांडर उदय जोगळेकर आणि उपाध्यक्ष विजय जोगळेकर यांनी दिली.
सांगितले की, 2005मध्ये अंकुर जोगळेकरचे अपघातात निधन झाले. अंकुर हा आयडीयाज अ सास कंपनी काम करत होता. त्याचबरोबर तो एक गुणवान अष्टपैलू क्रिकेटपटू देखील होता. त्याने १९ वर्षाखालील संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व देखील केले होते व विदर्भच्या राष्ट्रीय संघात देखील त्याचा समावेश होता. स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात चार संघ अशी चार गटात विभागणी करण्यात आली असून यातील अव्वल दोन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, ३ मार्च २०२४ रोजी होणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी महिला क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष विंग कमांडर उदय जोगळेकर, उपाध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज-अ-सास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केएस प्रशांत, वित्तीय विभागाच्या प्रमुख मल्लिका जेम्स, आयडीयाज इंडिया ऑपरेशन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज-अ-सास कंपनीचे माजी संचालक विद्याकांत काला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.