मुंबई : करोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीने करोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोना लसीकरणाच्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या कार्यक्रमात केले.
बीकेसी येथील करोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊन लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यावेळी पर्यटन तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार झीशान सिद्दीकी, उपमहापौर सुहास वाडकर यांच्यासह पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी या कोविड सेंटरमधील आहार तज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली लस घेण्याचा मान मिळाला. त्यानंतर डॉ. मनोज पाचंगे यांना लस देण्यात आली. टाळ्यांच्या गजरात कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला.
आजचा दिवस क्रांतीकारी आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नाही. दिवसरात्र तणाव होता. जगभरात सगळीकडे अशीच स्थिती होती. युद्धकालीन परिस्थितीसारखे आपण 15 दिवसांत हे सेंटर उभारले आणि मुंबईत अनेक ठिकाणी तसेच राज्यभरात आपण अशी सेंटर उभारली असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या सेंटरमध्ये जुन-जुलैपर्यंत करोनाच्या रुग्णांची गर्दी होती. इथे काम करताना आपले काय होणार याचा विचार न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांचे जीव वाचवणाऱ्या कोविड योद्धांना मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला.
आपण खूप दिवसांपासून “लस येणार’ असे ऐकत होतो. आज आपल्या हातात लस आहे. पण, आपल्याला करोनाचा शेवट करायचा आहे तोवर सर्व सूचनांचे कोटेकोर पालन करावे. अजूनही संकट टळलेले नाही. लस आलेली असली तरी सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
मुंबईत एकाच वेळी 1 कोटी 2 लाख लस साठवणुकीची क्षमता
मुंबईत एकाच वेळी 1 कोटी 2 लाख लस साठवणुकीची क्षमता असल्याचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितले. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवणुक क्षमता असून लसीकरणासाठी 500 पथके व दिवसाला 50 हजार जणांना लसीकरणाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त चहल, अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी, बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.