दादा की ताई? मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल? प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…

नगर – येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्रातील नवनिर्वाचित तरुण आमदार आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, धिरज देशमुख, रोहित पवार, ॠतुराज पाटील, व झिशान सिद्दीकी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित युवा आमदारांसोबत संवाद साधताना संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ‘रॅपिड फायर’ राउंड घेत राजकीय ‘कात्रीत’ पकडणारे काही प्रश्न विचारले. मात्र या सर्व आमदारांपैकी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा ‘रॅपिड फायर’ राउंड विशेष गाजला.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहित पवार यांनी ‘रॅपिड फायर राउंड’मधील प्रश्नांना उत्तरं देताना आजोबा शरद पवार यांच्याच स्टाईलचा वापर केल्याचं पाहायला मिळालं. रॅपिड फायर राउंडमध्ये अवधूत गुप्ते यांनी रोहित पवारांना १)कोणता खलनायक जास्त आवडतो? तात्या विंचू की कवठ्या महाकाळ? २) मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? अजित पवार की सुप्रिया सुळे? ३) कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत सुजय विखे की सत्यजित तांबे? असे तीन प्रश्न विचारले, पहिल्या व तिसऱ्या प्रश्नांना उत्तरं देताना रोहित पवारांनी जबरदस्त बॅटिंग केली मात्र ताई की दादा या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी चेंडू शरद पवारांच्या कोर्टात ढकलला.

रॅपिड फायर मध्ये विचारण्यात आलेल्या, मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? अजित पवार की सुप्रिया सुळे? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी, ‘शरद पवार ज्यांना ठरवतील तो मुख्यमंत्री आम्हाला आवडेल’ असं उत्तर दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.