राऊत यांनी ते बोलणं टाळायला हवं होतं – शरद पवार

नाशिक -शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याविषयी बोलणं टाळायला हवं होतं. अर्थात, राऊत यांनी ते वक्तव्य मागे घेतल्याने आता वादावर पडदा पडला आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मांडली.

इंदिरा गांधी याही मुंबईचा डॉन करील लाला याची भेट घेत असत, असे वक्तव्य नुकतेच राऊत यांनी केले. त्यामुळे वादंग निर्माण झाले. कॉंग्रेसकडून त्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्षांत धुसफूस सुरू झाल्याचे चित्र पुढे आले. त्यापार्श्‍वभूमीवर, पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील प्रचारावेळी स्वत:बद्दल उठलेल्या वावड्यांची आठवणही सांगितली. सार्वजनिक जीवनात सक्रिय असणाऱ्यांना अनेक जण भेटत असतात. त्यातील सगळ्यांचीच माहिती नसते. मुंबईतील एका प्रचार सभेत माझ्या बरोबर डॉन हाजी मस्तान व्यासपीठावर बसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हाजी मस्तान कोण हेही मला ठाऊक नव्हते, असे ते म्हणाले.

राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये कुठली धुसफूस असल्याचे पवार यांनी फेटाळून लावले. सत्ताधारी पक्षांचे नेते प्रगल्भ आहेत. आपल्याला सरकार चालवायचे असल्याची जाणीव त्यांना आहे. सरकारमध्ये नसताना काय होते याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. आम्ही मूळचे कॉंग्रेसजन आहोत. कॉंग्रेसजन व्यवहार्य विचार करतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here