कराड – जिल्ला पोलीस दलाने गेल्या वर्षभरात पाठवलेल्या 14 प्रस्तावांना मंजुरी देऊन दीडशेहून अधिक गुन्हेगारांवर”मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यात कराड तालुक्यातील 40 जणांवर कारवाई झाली आहे. आता जिल्हा पोलीस दलाकडून “मोक्का’ कारवाईचा कोणताही नवा प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश पवार व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
वारके म्हणाले, सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांचे लक्ष असून युवकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. कराड शहरात वाहतुकीची समस्या सर्वात मोठी असून त्यावर काम करावे लागणार आहे. शहरातील मुख्य ठिकाणी कोल्हापूर नाक्यावरील
उड्डाण पुलावरून दुहेरी वाहतूक करण्याचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाऊ शकतो. शाहू चौक व दत्त चौकातील वाहतुकीवर उपाययोजना करण्यात येतील. वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी बॅरेकेड्स लावावेत. तेजस्वी सातपुते म्हणाल्या, कराड पालिका व पोलिसांची संयुक्त बैठक लवकरच घेऊन वाहतुकीची समस्या सोडवण्यात येईल.
अतिक्रमणांवरील कारवाईबाबत समन्वय साधून निर्णय घेतला जाईल. पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे गतवर्षी झालेल्या मुलींच्या खुनाचा तपास योग्य दिशेने सुरू असून संशयितांची नार्को चाचणी केली जाईल. या गुन्ह्याचा छडा लवकरच लावला जाईल.