संगमनेर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात व पारनेरचे राहुल झावरे उपस्थित होते. लंके म्हणाले की, आमदार थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे.
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना त्यांनी सातत्याने मदत केली. त्यांचा आशीर्वाद हा राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आज त्यांच्या भेटीसाठी आलो असल्याचे लंके यांनी सांगितले.
आमदार थोरात म्हणाले की, लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा, पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम सातत्याने करणारे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे मोठे नाते आहे. नगर दक्षिणमध्ये समोरचे उमेदवार मोठे आहे.
ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरिबाची लढाई होणार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमदार लंके यांचे मोठे यश राहणार आहे. हे यश महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचे राहणार असल्याचेही आमदार थोरात यांनी सांगताना लंके हे नक्कीच विजय होतील, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.