लखनौ: मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 85 वर्षीय टंडन यांना ताप आणि मुत्राशयाशी संबंधित विकार आहेत.
त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या घेण्यात आल्या असून मेदांता हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. टंडन यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काहीही कारण नाही. त्यांना रविवारी हॉस्पिटलमधून घरी पाठवले जाईल, असे मेदांता हॉस्पिटलचे संचालक राकेश कपूर यांनी सांगितले.
टंडन सध्या त्याचा मूळ जिल्हा असलेल्या लखनौमध्ये आहेत, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. लखनौमधूनच लोकसभेची निवडणूक लढवून ते खासदार झाले होते. ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.