विविधा: ललिता पवार

माधव विद्वांस

खलनायिका म्हणून खाष्ट सासूची भूमिका अफलातून वठविणाऱ्या ललिता पवार यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म येवला येथे 18 एप्रिल 1916 रोजी झाला. त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत सुमारे 700 चित्रपटांत भूमिका केल्या. चीड निर्माण करणारे हावभाव व शब्दफेक हे त्यांचे कसब होते. अशिक्षित असल्याने त्यांचे जीवन खडतर होते. त्या पुणे येथे आल्या. सिनेमा त्यांनी बघितलाही नव्हता. अभिनय म्हणजे काय हे सुद्धा त्यांना माहीत नसावे. आर्यन फिल्म कंपनीचे मालक नानासाहेब सरपोतदार यांच्याकडे घरकाम करण्यासाठी त्या येऊन राहिल्या. त्यांच्याकडे धुणीभांडी करणे असे हलके काम होते. नानासाहेबांना काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी “पतितोद्धार’ या चित्रपटात एक छोटी भूमिका त्यांना दिली. मिस अंबु या नावाने त्यांनी चित्रपटसृष्टीत वर्ष 1928 मधे कारकीर्द सुरू केली. त्याकाळी चालणाऱ्या मूकपटातून त्या साहाय्यक म्हणून काम करू लागल्या.त्याचवेळी दिग्दर्शक जी. जी. पवार यांच्याशी त्यांची ओळख झाली व 1938 मधे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला व ललिता पवार या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

एकदा एका चित्रपटात मास्टर भगवान त्यांना थोबाडीत मारतात असे दृश्‍य दाखवायचे होते. त्यावेळी मास्टर भगवान यांनी त्यांच्या कानाखाली मारलेले इतके जोरात लागले की त्यांच्या कानातून रक्त आले व त्यांना डाव्या बाजूला लकवा आला. त्या बऱ्या झाल्या; पण त्यांचा डोळा आपोआप उघडला जाई व बंद होई. त्याचा त्यांनी आपल्या भूमिकेसाठी चांगला वापर करून घेतला. त्याकाळच्या आघाडीच्या कलाकारांपैकी राज कपूर, शम्मी कपूर, नूतन, मीनाकुमारी अशा सर्वच नामवंत कलाकारांसोबत त्यांनी काम केले. श्री 420, परवरीश, अनाडी, ससुराल, जंगली, सेहरा, संगम, लव इन टोकियो, सूरज, भरोसा अशा गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी निर्मिती क्षेत्रातही प्रवेश करायचा प्रयत्न केला.

वर्ष 1938मधे “दुनिया क्‍या है’ या हिंदी चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. त्यांनी हिंदी बरोबर गुजराती, भोजपुरी, मराठी चित्रपटांमधूनही अभिनय केला. घरचा भेदी, सतीचं वाण, कुलस्वामिनी अंबाबाई हे त्यांचे मराठी चित्रपटही लोकप्रिय झाले. विशेष करून सुनेला छळणारी सासू या भूमिकेत त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. सुनेला छळणारी कजाग सासू, त्यांनी काही चित्रपटांतून इतक्‍या सुरेखरित्या साकारली की, चित्रपट पाहतानाही बायका त्यांचा धसका घेत. वयाच्या 12 वर्षापासून चित्रपटांत काम करणाऱ्या ललिता पवार यांची विक्रमी सिनेकारकीर्द एकूण 70 वर्षांची आहे. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी नायिकेची भूमिकाही केली होती.

त्यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. दूरदर्शनवरील रामायण या मालिकेमध्ये त्यांनी मंथरेची भूमिका केली होती. वयाची सरासरी उलटल्यावर त्या एकाकी झाल्या व त्यांनी मुंबई सोडून पुण्याला स्थाईक झाल्या. त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या जवळ कुणीही नव्हते. दोन दिवसांनी घराचा दरवाजा फोडल्यानंतर त्यांचा निःचेष्ट मृतदेह आढळला. या जिद्दी कलाकाराला अभिवादन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.