अबब! केवढा हा हार

प्रकाश राजेघाटगे

पुसेगाव –
सध्याच्या युगात अनेक क्षेत्रात नानाविध प्रकारचे विक्रम प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होत असतात. यामध्ये राजकीय क्षेत्राला अपवाद मानले जात होते. मात्र, पुसेगावच्या एका कट्टर शिवसैनिकाने आपल्या नेत्यासाठी विक्रमांत नोंद होईल, अशीच एका घटना घडविली आहे. या शिवसैनिकाने तब्बल 40 फूट उंच व 20 फूट रुंदीचा महाकाय हार आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी तयार केला होता. प्रताप जाधव असे या शिवसैनिकाचे नाव असून पुसेगाव येथे सभेसाठी येणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी हा महाकाय हार बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “गिनीज वर्ल्ड बुक’ने या हाराची नोंद घ्यावी, असाच हा हार असून राज्यात, नव्हे तर देशातील पहिलाच हा हार असेल, अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.

ज्याप्रकारे सिनेकलाकारांचे फॅन असतात त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांचेही प्रचंड फॅन असतात. अनेकांना सिनेकलाकारांसारख कलाकार होण्याचं वेड असत. तसेच अनेकांना राजकीय नेता होऊन समाजकारण करण्याचंही. पुसेगाव येथील प्रताप जाधवही यापैकीच एक. सुरुवातीपासूनच राजकारणात येऊन समाजकारणाची त्यांना आवड. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रताप जाधवांची निष्ठा. पुसेगावसह परिसरात ते कट्टर शिवसैनिक म्हणून प्रसिद्धी. प्रताप जाधव यांना त्यांच्या निष्ठेचे फळही पक्षाने दिले. सुरुवातीला पुसेगाव शहराध्यक्ष नंतर तालुका प्रमुख आणि आता जिल्हा उपप्रमुख पदाची धुरा जाधव यांच्याकडे देऊन पक्षाने त्यांचा सन्मान केलाच आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीला त्यांना पक्षामार्फत तिकीटही मिळण्याची शक्‍यता आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे कोरेगाव येथे लोकसभेच्या प्रचारासाठी आले होते. आदित्य ठाकरे येणार असल्याचे समजल्यानंतर प्रताप जाधव यांना सेनेचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना दिमतीला घेत आदित्य ठाकरे यांचे अनोख्या प्रकारे स्वागत करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी महाकाय हार बनविण्याचा निर्णय घेतला आणि या सर्वांनी मिळून सुमारे 40 फूट उंच व 20 फूट रुंद असा महाकाय पुष्पहार तयार केला. इतका मोठा हार बहुधा जिल्ह्यातच काय तर राज्य, देशातील पहिलाच असावा. या हारासाठी अक्षरश: क्रेनचा आधार घ्यावा लागला. एवढा मोठा महाकाय हार बघून आदित्य ठाकरेच नव्हे तर सर्वच नेते आवाक्‌ झाले.

प्रताप जाधव यांच्या या अनोख्या स्वागताने आदित्य ठाकरे भारावलेही, तसेच प्रताप जाधव यांनी बनविलेल्या या हाराची नोंद “गिनीज वर्ल्ड बुक’मध्येच व्हायला हवी, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रताप जाधव यांनी बनविलेला हा महाकाय हार राजकीय नेत्यांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्याही चर्चेचा विषय ठरला आहे, आजवर अनेक घटनांची विक्रम म्हणून नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे प्रताप जाधव यांच्या या हाराची विक्रम म्हणून नोंद होणार की नाही हे माहीत नसले तरी जाधव यांचा हा सत्कार आदित्य ठाकरेंसाठी विक्रमच ठरला आहे हे मात्र नक्की.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.