मुंबई – चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके घरा घरात पोहचला. सिनेमा असो टीव्ही कुशल आपल्या निखळ मनोरंजनासाठी ओळखला जातो. मात्र लवकरच कुशल आपल्याला एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. जत्रा,पांडू,बारायण असे अनेक कॉमेडी सिनेमे केल्यानंतर कुशल आता एका निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तो ऐतिहासिक भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुशलने यापूर्वी बहुतेकदा कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. ‘डावपेच’ या एकाच चित्रपटात कुशल काहीश्या वेगळ्या भूमिकेत दिसला होता. यानंतर आता कुशल थेट ऐतिहासिक ती देखील नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. याबाबतचे कुशलचे काही फोटो देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये तो एखाद्या मुघल सैनिकाच्या भूमिकेत असल्याचे समजते.
‘रावरंभा’ या आगामी चित्रपटात कुशल ‘कुरबतखान’ नावाचे पात्र साकारणार आहे. कुरबतखानच्या गणवेशातील कुशलचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. फोटोवरून त्याचे पात्र किती क्रूर असेल याचा प्रत्त्यय येतोय. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील अनेक प्रेमकहाण्या आणि इतिहास दडलेले आहेत. अशीच एक प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येणार आहे. याचे बरेचसे चित्रकारानं साताऱ्यात होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.
अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय जाधव निभावणार आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत. त्यासोबतच या चित्रपटात अभिनेता ‘शंतनू मोघे’ पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.