वाघोली, (प्रतिनिधी) -हवेली तालुक्यात 22 हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मोडी लिपीतील नोंदींचे मराठी भाषांतर करून गावोगावच्या तलाठी कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. हवेली तालुक्यात कुणबी जात प्रमाणपत्र (दाखले) देण्यासाठी महसूल विभागाने गावोगाव मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील 17 मंडल विभागात कुणबी दाखल्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
वाघोली मंडलाधिकारी कार्यालयांतर्गत 29 फेब्रुवारी रोजी वाघोली तलाठी कार्यालय येथे तर 1 मार्च रोजी वाडेबोल्हाई ग्रामपंचायत कार्यालय येथे कुणबी दाखल्याबाबतच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वाघोलीचे मंडलाधिकारी अशोक शिंदे यांनी दिली. कुणबी नोंदीची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह दाखल्यांसाठी अर्ज दाखल करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे अष्टापूर मंडल विभागांतर्गत 28 फेब्रुवारी रोजी अष्टापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे तर लोणीकंद मंडल विभागांतर्गत 29 फेब्रुवारी रोजी लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी लागणार्या कागदपत्राबाबत मंडल अधिकारी, तलाठी व संबंधित विभागाचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज, स्व:घोषणापत्र व फोटो
नागरिक सुविधा केंद्रातील वंशवळीबाबत प्रतिज्ञापत्र
लाभार्थी व अर्जदार (वडील) यांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे जात प्रमाणपत्र असल्यास दोघांचे आधारकार्ड
आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला (महसुली पुरावा)
सन 1967 पूर्वीचे हवेलीतील कायमस्वरुपी वास्तव्याचे कुणबी’जात नमुद महसुली पुरावे. (सातबारा, वारस फेरफार, गाव नमुना नं. 14, कढईपत्रक) किंवा
सन 1967 पूर्वीचे हवेलीतील रक्तनाते संबंधातील कुणबी जात नमुद पुरावा जोडणे. (उदा. सख्खे/चुलत-चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा इ.)
मोडीलिपी असल्यास मोडीलिपी भाषांतर प्रमाणपत्र
रहिवास पुरावा-चालू वीजदेयक (लाईटबिल)
जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यास
तहसीलदार व मंडल अधिकारी यांचा गृहचौकशी अहवाल