मुंबई – अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता प्रभास त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मिडीयावर याबाबत अनेक प्रतिक्रिया पुढे येताना दिसत आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमासाठी क्रिती-प्रभाससह अभिनेता सनी सिंह आणि ओम राऊत यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती.
आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचवेळी क्रिती आणि प्रभास यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोघांनीही या चित्रपटातील त्यांच्या पात्रांबद्दल सांगितले. यावेळी क्रिती सेनन कमालीची सुंदर दिसत होती. या सोहळ्यासाठी अभिनेत्री खास पांढरी आणि सोन्याची साडी परिधान करून आली होती आणि आई सीतेच्या भूमिकेतील तिचा लूक इथेही प्रेरणादायी दिसत होता.
तिने फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधून ही साडी निवडली आहे, ज्यामध्ये तिचा मोहक पारंपारिक लूक खूप सुंदर दिसत होता. या साडीवर किचकट काम करून तांबे आणि सोन्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे या साडीचा लूक आणखीच खुलून दिसत होता.
ही एक प्रकारची विंटेज साडी होती, जी केरळमधील कॉटन फॅब्रिकपासून बनवली गेली होती. साडीवर खादीच्या ब्लॉक प्रिंट्स दिसत होत्या आणि 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला होता. माता सीतेची भव्यता दाखवण्यासाठी या प्रकारची साडी क्रितीसाठी तयार करण्यात आली होती. सध्या अभिनेत्रीचे या साडीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत असून, फॅन्स देखील यावर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.