– सुनील राऊत
पुणे – शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गर्दीमुळे करोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढण्याची भीती होती. मात्र, तूर्तास ती अनाठायी ठरली असून मागील पंधरवड्यात करोनाबाधित वाढीचा वेग “जैसे थे’ आहे. विशेष म्हणजे, चाचण्या वाढूनही हे प्रमाण कायम असल्याने काही अंशी दिलासा आहे.
पालिकेच्या निर्णयानुसार दि. 3, दि.5 आणि दि. 8 जून रोजी शहर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले.
त्यामुळे दि.8 जूनपासून नागरिकांची वर्दळ वाढली. यातून मॉल, मंदिरे, शाळा, सिनेमागृह, नाट्यगृह, सलून, पानटपरी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगळता जवळपास सर्वच व्यवसाय, खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला करोनाची लक्षणे दिसण्यास 5 ते 7 दिवस लागत असल्याने दि.15 जूनपर्यंत शहरात करोना संसर्ग वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने गृहीत धरली होती. मात्र, प्रत्यक्षात मेअखेरच्या पंधरवड्यात सापडलेल्यांपेक्षा फक्त 39 बाधित जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाढल्याचे समोर आले आहे.
पालिकेचा अंदाज चुकला?
शहराचा करोनाबाधित दुप्पट होण्याचा कालावधी सध्या 19 दिवसांवर गेला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात तो 16 ते दिवसांचा होता. त्यामुळे लॉकडाऊन शिथिलतेनंतर तो पुन्हा 12 दिवसांवर येईल, अशी भीती आरोग्य विभागाला होती. मात्र, जूनमध्ये तो 19 दिवसांवर गेला. लॉकडाऊननंतर शहरात दैनंदिन रुग्ण सापडण्याचे प्रमाण 25 ते 30 टक्के वाढेल, असा अंदाज आरोग्य विभागाने गृहित धरला होता. मात्र, जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांत तो चूकला आहे.
चाचण्या वाढूनही रुग्णवाढ स्थिरच
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, दि.15 ते 31 मे या कालावधीत शहरात एकूण 20,301 चाचण्या घेण्यात आल्या. त्यात 3,389 बाधित आढळून आले होते तर, दि. 1 ते 15 जूनदरम्यान सुमारे 24,348 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात सुमारे 3,418 नवीन बाधित आढळले आहेत.