दहिवडी – माण तालुक्यातील मार्डी गावची कन्या कोमल अंकुश सावंत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून महाराष्ट्रातून अनुसूचित जाती मुलींमधून अनुक्रमे चौथा व दुसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले. त्याबद्दल मार्डी ग्रामस्थांच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करत कोमल हिचे वडील अंकुश नामदेव सावंत यांनी गवंडी काम करत मुलांना शिक्षण दिले. कोमलने तिचा संपूर्ण अभ्यास घरी राहून कोणत्याही क्लासची मदत न घेता स्वतः अभ्यास करून हे यश मिळवले हे खूप कौतुकास्पद आहे. या प्रवासात तिची आई आशा सावंत यांनी तिला कोणत्याही घर कामात न गुंतवता पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन प्रोत्साहित केले. तिचा लहान भाऊसुद्धा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत असून अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच दुसरा भाऊ वडिलांसोबत गवंडी काम करत या दोघांना खंबीर पाठिंबा देत आहे. तिच्या यशामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे.
मार्डी ग्रामस्थांच्यावतीने तिची गावामधून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, डॉ. भारतीताई पोळ, सोनालीताई पोळ, चेअरमन योगेश पोळ, प्रभाकर पोळ, शिवाजी पोळ, डॉ. उज्वल काळे, सुदाम नारणवर, अशोक पवार, नंदकुमार पोळ, सरपंच संगीता दोलतडे, पोलीस पाटील आप्पासो गायकवाड, राजेंद्र पोळ यांच्यासह पंचक्रोशीतील व गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित
होते.
खचून न जाता मिळवले यश
कोमलचे शिक्षण पहिली ते दहावी मार्डी गावामध्येच झाले. बारावी व बी. एस्सी. चे शिक्षण दहिवडी कॉलेजमधून पूर्ण केले. नंतर 2018 मध्ये तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2019 मध्ये पहिल्या प्रयत्नात दोन गुणांनी अपयश आल्यानंतर खचून न जाता जिद्दीने अभ्यास करून 2020 च्या निकालात तिने यश मिळवले.