तळेगाव दाभाडे, दि. 22 (वार्ताहर) – आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी हा रोजगार मेळावा सुरू केला आहे. याआधी, ऑक्टोबरमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात, 75 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूरसह देशभरातल्या 43 ठिकाणी या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. पुण्यात तळेगाव दाभडे येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या विविध विभागात, संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या 213 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आठवले यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अर्थ विभागाचे महाव्यवस्थापक विजयकुमार कांबळे, पोस्टमास्तर आर. के. जायभाये, संरक्षण विभागाचे प्रदीप महाडेश्वर, मिलिंद लाटकर, सीआरपीएफचे उपमहानिरिक्षक दर्शनलाल गोला, धीरज कुमार आदी उपस्थित होते. नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीपत्रांची प्रत्यक्ष प्रत देशभरातील 45 स्थळांवर सुपूर्त करण्यात येईल. यापूर्वी भरण्यात आलेली पदे वगळता, शिक्षक, व्याख्याता, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदे देखील भरली जात आहेत. विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) गृह मंत्रालयाकडून लक्षणीय संख्येने पदे भरली जात आहेत.रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे देशभरात ठिकठिकाणी वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय विकासात थेट सहभागाची संधी
रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मिती आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्यासाठी प्रेरक म्हणून काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.