#IPL 2021 : हैदराबादविरुद्ध कोलकाताचे पारडे जड

सामन्याची वेळ सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टसवर

चेन्नई  – सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज यंदाच्या आयपीएलचा सामना होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांची फलंदाजी तोडीस तोड आहे. दोन्ही संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा असल्याने हा सामना रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे.

हैदराबादच्या संघाबाबत बोलायचे झाल्यास कर्णधार डेव्हिड वॉर्नरवरच फलंदाजीचा 80 टक्के वाटा उचलण्याची जबाबदारी आहे. अर्थात, गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या स्पर्धेत त्यांची फलंदाजी जास्त सरस दिसण्याची शक्‍यता आहे. त्यांच्या संघात भरात असलेला जेसन रॉय, मनीष पांडे, केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, प्रियम गर्ग व केदार जाधव असा भक्कम फलंदाजांचा ताफा आहे.

गोलंदाजीचे अवलोकन केल्यास सर्वोत्तम लेग स्पीन गोलंदाज रशिद खानसह भुवनेश्‍वर कुमार, यॉर्कर किंग टी. नटराजन, मिशेल मार्श व जेसन होल्डर अशी भेदक गोलंदाजांची फळीही आहे. तसेच त्यांच्याकडे होल्डर, मार्श, सिद्धार्थ कौल, बासीत थम्पी आणि खलील अदमद असे अष्टपैलू देखील आहेत.

त्यातही होल्डरच्या समावेशाने त्यांची फलंदाजी खोलवर सशक्‍त बनली आहे. आयपीएल स्पर्धेचे एकदा विजेतेपद पटकावल्यानंतर हैदराबादचा संघ यंदाही विजेतेपदाची दावेदारी करत आहे. मात्र, त्यासाठी त्यांना कोलकाताला रोखावे लागेल.

कोलकाताच्या संघाची ताकद पाहता त्यांचे पारडे जड राहण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यांची फलंदाजी हैदराबादपेक्षाही सरस आहे. त्यांच्याकडे शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, करुण नायर, सुनील नरीन, दिनेश कार्तिक व इयान मॉर्गन अशी तगडी फलंदाजी आहे. त्यातही त्रिपाठी, गिल व मॉर्गन हे सध्या भरात असल्याने हैदराबादच्या गोलंदाजांना त्यांना रोखण्याचेच आव्हान पेलावे लागणार आहे.

त्यांची गोलंदाजी पाहिल्यास पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, हरभजन सिंग, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा व वरुण चक्रवर्ती अशी भेदक गोलंदाजीही आहे. त्यातही आंद्रे रसेल व शकिब अल हसन, नरीन हे अष्टपैलू असल्याने त्यांच्याकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता आहे.

गेल्या पाच मोसमांपासून कोलकाता संघ या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. मात्र, त्यांना विजेतेपदाने एकदाच यश दिले. त्यानंतर त्यांना हुलकावणीच दिली आहे. हे अपयश त्यांना सलत असून यंदा ते पूर्ण ताकदीने या स्पर्धेत उतरणार आहेत.

रसेल, नरीन लक्षवेधी ठरतील
गेल्या वर्षी अमिरातीत झालेल्या स्पर्धेत दिनेश कार्तिक व रसेल यांच्यात बेबनाव असल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांचे मनोमिलन झाले असून आता ते खांद्याला खांदा लावून या स्पर्धेत उतरले आहेत. त्यातही सुनील नरीनने या स्पर्धेत प्रत्येक वेळी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तो डावाची सुरुवात करताना आक्रमक फलंदाजीही करतो तर गोलंदाजीतही अफलातून कामगिरी करत आहे. त्याचे गोलंदाजीतील बदल व कॅरम बॉल प्रत्येक संघाला त्रासदायक ठरले आहेत. त्यामुळे याच दोघांच्या कामगिरीवर सामन्याचा निकालही अवलंबून राहणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.