Kolkata Building Collapse – कोलकाता येथील गार्डन रीच परिसरात एक बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांसह किमान पाच जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. अजून किमान चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजले आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते असे बचाव कार्यात गुंतलेल्या अग्निशमन सेवा अधिकाऱ्याने सांगितले.
कोलकाताचे महापौर फरहाद हकीम यांनी सांगितले की, ही इमारत बेकायदेशीरपणे बांधली जात होती त्या ठिकाणी बचाव कार्य युद्धपातळीवर करण्यात आले. इमारतीचे प्रवर्तक मोहम्मद वसीम याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे महापौरांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी बेकायदेशीर बांधकामाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.काल मध्यरात्रीच्या सुमाराला ही घटना घडली. खाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गॅस कटर आणि इतर उपकरणे वापरली जात आहेत.
अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आम्ही पीडितांच्या दिशेने सावधपणे पुढे जात असल्याने बराच वेळ लागत आहे, एनडीआरएफ, राज्य आणि कोलकाता पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन पथकेही एकत्रितपणे काम करत आहेत. ( Kolkata Building Collapse )