कोल्हापूर | ज्ञानाचा उपयोग वंचितांच्या उत्थानासाठी करा – प्रा. अनिल सहस्रबुद्धे

 शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभास सात हजार जणांची ऑनलाईन उपस्थिती

कोल्हापूर – नवपदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील वंचित, शोषित घटकांच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे चेअरमन प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते.

कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते, तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचा सुमारे सात हजार नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात ७७,५४२ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्रे व पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आल्या.

प्रा. सहस्रबुद्धे नवपदवीधरांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आज आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आणि आयुष्याच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तीव्र स्पर्धेला सामोरे जात आपण या गौरवशाली परंपरेच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि आपले शैक्षणिक कार्य मोठ्या तन्मयतेने साध्य करण्याचा प्रयत्न केला.

कठोर परिश्रम आणि उच्च कोटीची समर्पण वृत्ती या जोरावर आपण आपली पदवी आणि पुरस्कार प्राप्त केले आहेत. हा आपणासह आपले आयुष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलणारे आपले शिक्षक, पालक अशा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. या विद्यापीठात आपण आपल्या उच्चशिक्षणाची सुरवात मोठ्या जोमाने व उत्कटतेने केली; पण मला खात्री आहे की, हा आपला प्रवास इथेच थांबणार नाही.

जोपर्यंत आपल्या जीवनाच्या प्रयोगशाळेतील अनिश्चितता, आव्हानांची पूर्तता, सकारात्मक वृत्तीने यश मिळविण्याची धमक आणि अपयशाला सामोरे जाण्याचा पूर्ण आत्मविश्वास आपल्यात निर्माण होत नाही, तोवर हा प्रवास संपत नाही. बर्‍याचदा व्यवस्थापन गुरु आणि अर्थशास्त्रज्ञ अस्थिर, अनिश्चित, जटिल आणि संदिग्ध अशा जगाबद्दल आपल्याला सांगत असतात.

तथापि, मी मात्र आपणास अगदी याच्या उलट म्हणजेच एसीयूव्ही अर्थात समर्पित कृती व सकारात्मक दृष्टिकोन, सहकार्य व साहचर्य आणि ऐक्य व अथक परिश्रम या त्रिसूत्रीच्या बळावर अविरत प्रयत्नांच्या साथीने अस्थिरतेवर मात करून विजयी वीर म्हणून आपला ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. सहस्रबुद्धे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, एकीकडे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य आणि दुसरीकडे आत्मनिर्भर भारत घडविण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले असतानाच्या अगदी योग्य वेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेले आहे.

त्यायोगे दर्जेदार शैक्षणिक संस्थांची निर्मिती, नाविन्यपूर्ण संस्कृती आणि अत्यंत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचीही ही योग्य वेळ आहे. तथापि, संस्थांना स्वायत्तता देणारी एक मजबूत व्यवस्था निर्माण करणे आणि त्या संस्थांना वित्तपुरवठा करणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम या बाबींना प्रेरणा देणे आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाची माहिती सर्वदूर पसरविणे गरजेचे आहे.

‘नॅक’चे ‘ए++’ मानांकन प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदन

शिवाजी विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या नॅकच्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘ए++’ मानांकन मिळविल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये विद्यापीठाबद्दल गौरवोद्गार काढले. विद्यापीठाने शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय दर्जा सिद्ध करण्याबरोबरच विद्यार्थीप्रियता, सामाजिक बांधिलकी या निकषांवर देश पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, याचा अभिमान असल्याचे कौतुकोद्गार राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्यासह मंत्री उदय सामंत आणि प्रा. सहस्रबुद्धे यांनी काढले.

सुमारे सात हजार जणांची लाइव्ह उपस्थिती

यंदा कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठाने ५७वा दीक्षान्त समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचे ठरविले. त्यानुसार आज हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवरुन थेट प्रक्षेपित करण्यात आला. ६९०६ नागरिकांनी हा कार्यक्रम लाइव्ह पाहिला. त्यानंतरही दिवसभरात सवडीनुसार लोक हा कार्यक्रम पाहात असल्याने आकडा वाढताच राहिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.