वेस्ट इंडिजच्या इयान बिशपकडून कौतुक
जमैका –भारताचा कर्णधार विराट कोहली व पाकिस्तानचा नवोदित फलंदाज बाबर आझम यांची फलंदाजी पाहिली की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण येते, अशा शब्दांत वेस्ट इंडिजचे माजी कसोटीपटू इयान बिशप यांनी या दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे.
कोहली व बाबर फलंदाजी करत असताना त्यांनी फटकावलेले स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, लॉफ्टेट पूल असे काही खास फटके सचिनचीच आठवण करून देतात. सचिन ज्या पद्धतीने आपली खेळी साकारायचा त्याच पद्धतीने हे दोघे खेळाडूही आपला डाव साकार करतात. हे दोन्ही खेळाडू अगदी सचिनप्रमाणेच स्ट्रेट ड्राइव्ह फटकावतात तेव्हा त्यांचे कौतुक वाटते. नॉन-स्ट्रायकर फलंदाजाच्या बाजूने स्ट्रेट ड्राइव्ह मारणारे फलंदाज जगात भरपूर आहेत. मात्र, सचिन गोलंदाजाच्या बाजूने स्ट्रेट ड्राइव्ह मारायचा ती खरी गुणवत्ता होती. आज कोहली व बाबर याच पद्धतीने फलंदाजी करतात, असे बिशप यांनी नमूद केले.
अर्थात, मला या दोघांची तुलना सचिनबरोबर करायची नाही. कारण सचिनची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. तो आधुनिक क्रिकेटचा सर्वात महान फलंदाज होता आणि आजही त्याच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही. मी त्याला जेव्हा गोलंदाजी करायचो त्यावेळी त्याच्या आक्रमकतेवर अंकुश कसा ठेवायचा हेच कळत नसे. सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह प्रत्यक्ष पाहणे हीच सर्वात नशिबाची बाब आहे. मात्र, कोहली व बाबर सचिनच्या पद्धतीनेच फलंदाजी करतात तेव्हा त्यांच्यावर सचिनच्या फलंदाजी शैलीचा किती मोठा पगडा आहे ते जाणवते, असेही बिशप म्हणाले.