अमरावती : विभागीय आयुक्तांकडून अचलपूर, धारणी येथील सुविधांची पाहणी

अमरावती : विभागीय आयुक्त पीयुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अचलपूर व धारणी येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी विविध बाबींचा आढावा घेतला.

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांत उपचारपद्धतीबाबत वेळोवेळी निर्गमित आदेशातील सर्व आदेशांचे काटेकोर पालन व्हावे. डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी चांगली सेवा बजावत आहेत. रुग्णालयात दाखल नागरिकांना दिलासा देऊन मनोबल वाढवावे. तपासण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश सिंह यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता आदी दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सातत्याने जनजागृती करावी, असे निर्देश नवाल यांनी दिले.

विभागीय आयुक्त  सिंह व जिल्हाधिकारी नवाल यांनी अचलपूर येथील कुटीर रूग्णालय स्थित कोविड रूग्णालयालाही भेट दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाकिर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. बी. ढोणे यांच्याशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

हातमाग केंद्राला भेट..

विभागीय आयुक्त श्री. सिंह व जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी धारणी तालुक्यातील मौजे मांडू येथील हातमाग केंद्रालाही भेट दिली. तेथील हातमाग यंत्रणेची पाहणी करून तेथील महिला सदस्यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली. मेळघाटात खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सोलर चरखे व पॉवर लूमचे वितरणाचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.