मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशन बाहेर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या या हल्ल्यात त्यांना चेहऱ्यावर जखम झाल्याचे दिसणारे व्हिडिओदेखील सगळीकडे प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, आता सोमय्या यांच्या या जखमेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे.
किरीट सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात किरीट सोमय्या यांना 0.1 सेंटीमीटरची जखम असल्याचे आढळून आले आहे. यासोबत सूज नव्हती आणि रक्तस्रावही नव्हता असे भाभा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. परंतु भाभा रुग्णालयाने किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील अहवाल मुंबई पोलिसांना सादर केला. या अहवालानुसार सोमय्यांना 0.1 सेंटीमीटरची जखम होती. शिवाय सूज नव्हती आणि रक्तस्रावही झाला नव्हता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या यांच्या जखमेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी टोमॅटो सॉस लावला असावा असेही राऊत म्हणाले होते. त्यामुळे ही जखम झाली होती की नाही याचा सुद्धा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे वाचन करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटल्याचे सांगितले जाते. तसेच किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याचे म्हटले जात होते. मात्र आता वैद्यकीय अहवालानंतर जी माहिती समोर आली आहे त्यावर आता मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.