योगी अदित्यनाथ यांच्या इशाऱ्यावरून कारागृहात कैद्यांची हत्या ?

3 हत्यांची CBIकडून चौकशी होण्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, दि. 16 – उत्तरप्रदेशात योगी अदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून कैद्यांची कारागृहातच पोलिसांकडून किंवा त्यांच्या इशाऱ्यावरून हत्या होण्याचे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार त्वरित थांबण्याची गरज आहे अशी मागणी करीत एका वकिलाने चित्रकुट जिल्हा कारागृहात झालेल्या तीन कैद्यांच्या हत्या प्रकरणाची सीबीआय किंवा एनआएकडून चौकशी करण्याची मागणी एका याचिकेद्वारे सुप्रिम कोर्टात केली आहे.

उत्तरप्रदेशत मार्च 2017 पासून ज्याज्या हत्या पोलिसांकडूनच झाल्या आहेत त्या सर्व प्रकरणांच्या चौकशीची मागणीही यात करण्यात आली आहे. 14 मे रोजी चित्रकुट कारागृहात तीन कैद्यांना गोळ्या घालून मारण्याचा प्रकार घडला आहे. हे तिघे जण बहुजन समाज पक्षाचे आमदार मुख्तार अन्सारी याच्या टोळीशी संबंधित होते असे सांगितले जात आहे. त्याच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातील वकील अनुप प्रकाश अवस्थी यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की गुंडांना संपवण्याच्या नावाखाली सरकारच अशा प्रकारच्या कृत्यांना प्रोत्साहन देत असेल तर ते कायद्याचे राज्य म्हणता येणार नाही.

सरकारकडूनच ही हिंसेची प्रवृत्ती जोपासले जाणे सामान्य नागरिकांच्याही हिताचे नाही. या प्रकारांना आळा घातला गेला नाही तर कोणत्याही नागरिकाला सुरक्षित राहणे अशक्‍य होऊन जाईल. किरकोळ भांडणातून किंवा वैमनस्यातून कोणाच्याही विरोधात तक्रारी दाखल करून त्याला काही दिवसातच अट्टल गुन्हेगार असे संबोधून त्याला कोठडीतच संपवण्याचे प्रकार सर्रास होत राहतील अशी भीतीही या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.