पुणे – शहरात एकीकडे अपहरणांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना वर्दळीच्या असलेल्या पुणे रेल्वे स्थानकातून अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस पथके बालकाच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. यापूर्वीही रेल्वे स्थानकावर अशा घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात मजुरी करणारे दाम्पत्य मुलासह त्यांच्या मूळगावी झारखंड येथे जाण्यासाठी पुणे स्थानकावर आले होते. यावेळी प्लॅटफॉर्म एकजवळील सरकत्या जिन्यालगत ते हावडा एक्सप्रेसची वाट पाहात होते. दरम्यान, एक महिला व पुरूष त्यांच्याजवळ आले. महिलेने मुलाला खाऊ दिला. यादरम्यान मुलाबद्दल जिव्हाळा असल्याचे दाखवून ते दोघे बाळाला खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले. बराचवेळ वाट पाहूनही ते परत आले नाही.
मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पुणे रेल्वे पोलिसांनी शोध घेतला. पण, चिमुकला सापडला नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा माग काढत आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
जोडप्याचा विश्वास संपादन करुन आरोपी त्यांच्या मुलाला घेऊन पळून गेले आहेत. तांत्रिक व इतर बाबींचा आधार घेत आरोपींचा माग काढण्यात येत आहे.
– प्रमोद खोपीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग