पळसदेव -पुणे-सोलापूर महामार्गालगतचे विजेचे खांब सध्या जाहिरातीचे बोर्ड लावण्यासाठी व्यावसायिकांकडून उपयोगात आणले जात आहेत. भिगवण ते इंदापूरच्या पट्ट्यात विजेच्या खांबावर जाहिरात लावण्याचे प्रकार सर्रास समोर येत आहेत. वीज वितरण कंपनीकडून; मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली होत आहे. महामार्गाचा भिगवण ते इंदापूर हा पट्टा मोठा वर्दळीचा व तेवढाच संवेदनशील असल्याने वेगवेगळ्या कारणाने हा टप्पा सारखा चर्चेत असतो. सध्या या टप्प्यात हॉटेल व्यवसायात मोठी वाढ झालेली आढळून येते. अनेक छोटी-मोठी हॉटेल या पन्नास किलोमिटर लांबीच्या टप्प्यामध्ये झालेली आहेत. हॉटेलची संख्या वाढल्याने व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे व्यावसायिक व्यवसायाच्या जाहिरातीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. याचाच एक भाग म्हणून काही व्यावसायिकांनी महामार्गालगच्या वीज वितरण कंपनीच्या उच्च दाब वाहिनीच्या खांबांचा आधार घेतल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी वीजेच्या खांबावर फ्लेक्स बोर्ड लावून व्यवसायाची जाहिरात केल्याचे दिसून येत आहे. यासाठी काही अर्थपूर्ण घडामोडी झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता पी. सी. जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, वीजेच्या खांबावर फ्लेक्स बोर्ड लावण्यास परवानगी दिली जात नाही. ज्यांनी अनधिकृतपणे बोर्ड लावले असतील त्याची पाहणी करुन कारवाई केली जाईल.