लाहोर – पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे ज्येष्ठ नेते ख्वाजा मुहम्मद आसिफ यांना आज 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. आसिफ यांना राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी मंगळवारी अटक केली होती. आज लाहोरमधील “एनएबी’च्या न्यायालयासमोर आसिफ यांना हजर केले असता त्यांना ही कोठडी सुनावण्यात आली.
“लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, “आयएसआय’ प्रमुख जनरल फैझ हमीद आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या करस्थानानुसार ख्वाजा मुहम्मद आसिफ यांना अटक झाली आहे. सरकार अस्वस्थ झाले आहे, हेच यातून दिसते आहे. मात्र अशा कृत्यांमुळे सरकारचा अंत जवळ आला आहे, हेच दिसते.’ अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लंडनमधून केलेल्या ट्विटमध्ये दिली आहे.
मात्र शरीफ यांना विरोध करण्यासाठी आसिफ यांच्यावर दबाव आणला जात आहे आणि आसिफ यांनी त्यास नकार दिल्यामुळे त्यांना अटक केली गेली, असा दावा “पीएमएल-एन’पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांनी केला आहे.
एकूण 210 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांच्या प्रकरणी “एनएबी’ने आसिफ यांच्याविरोधात प्रकरण दाखल केले आहे. आसिफ यांच्याकडे 1991 साली 51 लाख रुपयांची मालमत्ता होती. ती 2018 मध्ये 22 कोटी 10 लाख रुपये इतकी वाढली आहे. मात्र त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांमध्ये वाढ झालेली नाही, असे “एनएबी’ने म्हटले आहे.