पिंपरी, दि. 8 – “इंदोर पॅटर्न च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत खाऊगल्ली उभारण्यात येणार आहे. या खाऊगल्लीसाठी तब्बल 3 कोटी 70 लाख 23 हजार 603 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी “इंदोर पॅटर्न” राबविला जात आहे. शहरात ठिक-ठिकाणी खाऊ गल्ली उभारण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील हे आग्रही होते. त्यानुसार शहरातील विविध भागांत खाऊगल्ली सुरू करण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात येत आहे.
आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत खाऊगल्ली उभारण्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाने 4 कोटी 94 लाख 43 हजार 227 रुपयांची निविदा काढली होती. त्यासाठी 7 निविदा प्राप्त झाल्या. त्याता देव कन्स्ट्रक्शन, पृथ्वी एण्टरप्रायजेस, एच. सी. कटारिया, एस ऍण्ड जे बिल्डीकॉन, एजी असोसिएट्स व मंजुलाला कन्स्ट्रक्शन कंपनीचा समावेश होता. तर, निविदा रकमेपेक्षा कमी दरात काम करण्याची हमी देणाऱ्या देव कन्स्ट्रक्शनची 3 कोटी 70 लाख 23 हजार खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. ही खाऊ गल्ली अवघ्या तीन महिन्यांत उभारण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या कामासाठी पावणेचार कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.