गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा विजय मिळणार असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. या विधानसभेच्या १८२ जागांपैकी जवळजवळ १५७ ठिकाणी भाजप विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतमोजणीच्या माहितीनुसार भाजपने ७९ जागा जिंकल्या असून राज्यातील एकूण १८२ जागांपैकी ७९ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी गुजरातबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचला – देवेंद्र फडणवीस
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनमुळे हा विजय मिळाला आहे. भाजपावर विश्वास टाकल्याबद्दल मला राज्याच्या जनतेचे आभार मानायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करु असं आश्वासन आम्ही देतो. विरोधकांनी दिलेली निराधार आश्वासनं आणि तसंच मूर्ख बनवत केलेल्या खोट्या विधानांवर विश्वास न ठेवल्याबद्दली मी जनतेचे आभार मानतो,” असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुजरातच्या यशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “गुजरात निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास, सुशासन आणि लोककल्याणाच्या वचनबद्धतेचा विजय आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या भव्य विजयाबद्दल अमित शहा, भाजप कार्यकर्ते, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन.” असे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कांग्रेसने जवळजवळ विजय मिळवल्याचे दिसत आहे. हिमाचलच्या जनतेने पुन्हा एकदा आपली परंपरा कायम राखली आहे. येथील जनतेने आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला सलग दोन वेळा सत्तेत निवडून दिलेले नाही. त्याचमुळे भाजपला या ठिकाणी आपली सत्ता राखण्यात अपयश आले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश अशा दोन्ही निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरणाऱ्या आपला मात्र जनतेने नाकारले आहे.