पिंपरी, दि. 8 – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत होणार आहे. प्रशांत दामले यांनी अलिकडेच रंगभूमीवर 12 हजार 500 प्रयोग सादर करण्याचा कीर्तीमान केला आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा दामले यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मानपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात येणार आहे. मुलाखतीनंतर “एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा नाट्यप्रयोगही सादर केला जाणार आहे. सदर कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून प्रवेशिका प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उपलब्ध आहेत.
तसेच नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या सुरुवातीपासून सभासद असलेल्या चिंचवडमधील रहिवाशी आमदार उमा खापरे यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे कुटुंबीय म्हणून उमा खापरे यांचा गौरवही करण्यात येणार आहे. या वेळी राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी उपस्थित राहणार आहेत.