सरलेल्या वर्षात खादीच्या विक्रीत भरीव वाढ

नवी दिल्ली : 2018-19 या आर्थिक वर्षात खादीची विक्री 28 टक्‍क्‍यांनी वाढून 3,215 कोटी रुपये झाली आहे. हाताने बनविलेल्या खादीच्या विक्रीत 16 टक्‍के वाढ होऊन ती 1902 कोटी रुपये रुपये झाली असल्याची माहिती खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने दिली आहे.

केंद्र सरकारने खादीला चालना दिल्यामुळे देशात आणि परदेशात खादीचे उत्पादन व विक्री वाढत असल्याचा दावा मंडळाचे अध्यक्ष विनय कुमार सक्‍सेना यांनी केला. ते म्हणाले की, 2015 ते 19 या कालावधीत खादीच्या विक्रीत वाढ होत असल्याचे दिसून आले.

या काळात पॉली प्रकारातील खादीची विक्री 25.52 टक्‍क्‍यांनी वाढली तर सोलर प्रकारातील खादीची विक्री 34.86 टक्‍क्‍यांनी वाढली. 2004 ते 14 या काळात पॉलीची विक्री 6.48 टक्‍क्‍यांनी वाढली होती तर सोलरची विक्री 6.82 टक्‍क्‍यांनी वाढली होती असे त्यांनी सांगितले. नमो ऍपवरूनही खादीच्या कपड्याची बरीच विक्री होत असल्याचे ते म्हणाले.

2019-20 या कालावधीत खादीची विक्री 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. 2014-15 या वर्षात खादीची विक्री केवळ 1310 कोटी रुपयांची झाली होती. तर मंडळाकडील मनुष्यबळ केवळ 2002 इतके होते.

2018-19 यावर्षी खादीची विक्री 3,215 कोटी रुपये इतकी झाली आहे, तर मंडळाकडील मनुष्यबळ केवळ 1535 एवढे आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात मंडळाने चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. आता मंडळ निर्यातीवर मोठ्या प्रमाणात भर देणार असून त्यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खादीची निर्यात वाढणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.