प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -महामेट्रोने खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे. या मार्गासाठी सुमारे 8 हजार 565 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. खडकवासला ते स्वारगेट-हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार असून, या मार्गावर 22 स्थानके असणार आहेत. यापूर्वी हा मार्ग मेट्रो आणि “पीएमआरडीए’कडून संयुक्त करण्यात येणार होता. मात्र, पुम्टाच्या बैठकीत हा स्वतंत्र मार्ग करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार महामेट्रोने हा “डीपीआर’ तयार केला असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हा प्रारूप आराखडा असून, महापालिका प्रशासनाकडून त्यात बदल सुचविल्यानंतर अंतिम आराखडा करून राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
असा असेल मेट्रो मार्ग
हा मार्ग खडकवासला-सिंहगड रस्ता- स्वारगेट- शंकरशेठ रस्ता- राम मनोहर लोहिया उद्यान- मुंढवा चौक-खराडी असा असणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. हा मार्ग मुख्य सिंहगड रस्त्याने सारसबागेच्या समोरुन गणेश कला क्रीडा मंचाच्या समोरुन जेधे चौकातून शंकरशेठ रस्त्याने पुढे जाणार आहे. या मार्गावर एकूण 22 स्थानके असणार असून, स्थानके तसेच मेट्रो मार्गासाठी जास्तीत जास्त शासकीय जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी रस्त्यांची रुंदी कमी आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने खांबाची उभारणी केली जाणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
सिंहगड रस्ता ते पौड फाटा विस्तारही प्रस्तावित
महामेट्रोकडून खडकवासला ते खराडी मार्गाचा विस्तार करतानाच सिंहगड रस्ता ते पौंड फाटा असा मेट्रोचा विस्तार केला जाणार असून, हा मार्ग वारजेवरून असणार आहे. त्यामुळे पौंड रस्त्याप्रमाणेच पौड फाटा- कर्वे रस्ता-वारजे- महामार्गावरून माणिकबागपर्यंत सहा किलोमीटरचा मेट्रो मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. या मार्गातही 6 स्थानके असणार आहेत. तसेच पौड फाटा येथे हा मार्ग वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेस जोडण्यात येणार आहे. या मार्गाचाही प्रारूप आराखडा पालिकेस सादर करण्यात आला आहे.
वनाज ते रामवाडी मार्ग प्रस्तावित केल्यानंतर वारजेपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची मागणी केली जात होती. मात्र, या रस्त्यावर उड्डाणपूल प्रस्तावित असल्याने तसेच महामार्गही ओलांडावा लागत असल्याने महामेट्रोकडून तो मार्ग मागे ठेवण्यात आला होता. मात्र, आता हा मार्ग खडकवासला मार्गाला वर्तुऴाकार स्वरूपात जोडला आहे. त्यासाठी सिंहगड रस्त्यावर महामार्गाच्या बाजूला दौलतनगर हे स्टेशन असणार असून, तेथून वारजे, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा आणि पौड फाटा ही स्थानके असणार आहेत.
ही असतील 22 स्थानके
खडकवासला, दालवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु. ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे छावणी, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथनगर आणि खराडी चौक ही स्थानके असणार आहेत. तर स्वारगेट येथे नेहरू स्टेडीयमच्या समोर स्थानक असणार असून, या ठिकाणी येऊन प्रवाशांना स्वारगेट भूमिगत मेट्रोने पिंपरी-चिंचवड तसेच कात्रजकडे जाता येणार आहे. तसेच स्वारगेट येथील मल्टीमॉडेल हबचे पार्किंगच या कामासाठी वापरता येणार आहे.
चांदणी चौक ते वाघोलीपर्यंतही होणार विस्तार
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचाही विस्तार करण्यात येणार आहे. त्यात, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते खराडीपर्यंत हा विस्तार केला जाणार आहे. सुमारे 11 किलोमीटरचा हा विस्तार असून, या विस्तारामुळे 13 स्थानके वाढणार आहेत. त्यामुळे चांदणी चौक ते वाघोली असा मेट्रोचा थेट प्रवास पुणेकरांन करता येणार आहे. काही आठवड्यांपूर्वीच या विस्तारित मार्गाचा आराखडा महामेट्रोकडून पालिकेस सादर करण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गाला मान्यता देतानाच या दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याची पहिली मागणी करण्यात आलेली होती. या 11 किलोमीटरच्या मार्गात 13 स्थानके असणार असून त्यात, चांदणी चौक, कोथरूड बसस्टॉप, विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास, तुळजा भवानी स्टेशन, उबाळेनगर, अप्पर खराडी, वाघेश्वर, वाघोली, सिध्दार्थनगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी ही स्थानके असणार आहेत. त्यामुळे, वनाज ते रामवाडी हा मार्ग वाढीनंतर सुमारे 27 किलोमीटरचा होणार आहे.