पुणे – सूर्यदत्त नॅशनल स्कूल, सूर्यदत्त फिटनेस अँड स्पोर्टस अकादमी आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय बुद्धिबळ खुल्या स्पर्धेत 20 वर्षाखालील गटात केवल निर्गुण, 15 वर्षाखालील गटात ललितादिताय्यानर भूमीनाथन, 10 वर्षांखालील गटात अविरत चव्हाण, तर सात वर्षांखालील गटात हेयन रेड्डी विजयी झाले.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बावधन कॅम्पसमध्ये या स्पर्धचे नुकतेच आयोजन केले होते. पुण्यातील विविध शाळांमधून सुमारे 400 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. 7, 10, 15 व 20 वर्षाखालील अशा चार गटात स्विस लीग फॉरमॅटप्रमाणे ही स्पर्धा झाली. प्रत्येक गटात विजेत्यांची निवड करण्यात आली. एक लाखांपेक्षा अधिक रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 7 वर्षाखालील व 10 वर्षाखालील मुलांना भेटवस्तू देण्यात आली.
या प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहयोगी उपाध्यक्षा व स्पर्धेच्या संचालक स्नेहल नवलखा, अंकित नवलखा, सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला ओक उपस्थित होते. शिव छत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे राजेंद्र कोंडे, सूर्यदत्त नॅशनल स्कुलमधील ग्रॅंड मास्टर अभिमन्यू पुराणिक, आदित्य सामंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. रांका ज्वेलर्स, बुधानी वेफर्स, मारझोरिन सॅन्डविच, नीलांजन आर्टस्, जयपाल प्रिंटर्स, पीएनजी ज्वेलर्स, एम्पॉवर ट्युटोरियल्स आदींचे सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या.